Maval News : ‘ सीएसआर’मधून कामगारांसाठी लसीची व्यवस्था करा- वैशाली दाभाडे

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी आपापल्या कामगारांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी कंपन्यांमध्येच कोरोना लसीकरण व्यवस्था करण्याची मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी नगरसेविका संगीता शेळके उपस्थित होत्या. दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील लोकसंख्या आणि आरोग्यकेंद्राची सुविधा यामुळे लसीकरणाला खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात उर्से, नवलाख उंब्रे, तळेगाव दाभाडे, कान्हे, टाकवे, लोणावळा आदी भागात औद्योगिक कारखानदारी मोठ्या प्रमाणावर असून,कामगार वर्गाची संख्याही प्रचंड आहे. प्रत्येक कंपनीने आपल्या सीएसआर फ़ंडातून आपल्या कामगारांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी लसीकरण व्यवस्था केल्यास सोयीचे होऊन लसीकरण वेगाने पूर्ण होईल.

तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी याबाबत सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आदेश द्यावेत व आपल्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम यशस्वीपणे होईल, आपण लक्ष घालून लसीकरण मोहीम राबवावी, अशी विनंती दाभाडे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.