Maval News : भाजपने पुकारलेल्या ‘मावळ बंद’चा पुरता फज्जा – बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपने पुकारलेल्या ‘मावळ बंद’चा आज (बुधवारी) पुरता फज्जा उडाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा तसेच देहूरोड या शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. सर्वसामान्यांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांची दुकाने व व्यवसाय देखील सुरू होते. त्यामुळे मावळ तालुक्यातील जनतेने भाजपच्या आवाहनाला पाठ दाखविल्याचे स्पष्ट झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यासाठी बाळासाहेब नेवाळे यांच्यावर राजकीय आकसातून सत्ताधाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा भाजपने केला होता. विकासाचे राजकारण न करता भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असून अनेक सदस्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केला होता. नेवाळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत भाजपने मावळ बंदची हाक दिली होती.

बाळासाहेब नेवाळे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो सचिवांनी दाखल केला आहे. यात सत्ताधारी पक्षाचा काडीचाही संबंध नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, या प्रकरणावरून आता भाजपने पुकारलेला मावळ बंद हा अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केला होता. मावळमधील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार यांनी या बंदला प्रतिसाद न देता दैनंदिन व्यवहार सुरु ठेवावेत, असे आवाहनही भेगडे यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देत मावळच्या जनतेने भाजप नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी व्यक्त केली. प्रशासकीय कारवाईला राजकीय रंग देऊन कांगावा करणाऱ्या भाजप नेत्यांना मावळवासीयांनी धडा शिकवला आहे. मावळची जनता सूज्ञ असून ती यापुढे भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करून यापुढे तरी तालुक्यात विकासाचे राजकारण करावे, असा टोला बबनराव भेगडे यांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.