Maval News : भाजपच्या मावळ बंदला अत्यल्प प्रतिसाद; तालुक्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत

एमपीसीन्यूज : बाळासाहेब नेवाळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज, बुधवारी (दि.24) मावळ बंदची हाक दिली होती. मात्र, ग्रामीण भागासह शहरी भागात तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, लोणावळा व सोमाटणे तसेच प्रमुख बाजारपेठ असेलल्या कामशेत मध्ये दैनंदिन व्यवहार सुरु होते. त्यामुळे या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

मावळ बंदच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदकडे नागरिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे मावळ बंदला नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कामशेत, तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा, सोमाटणे, देहूरोड या प्रमुख शहरांसह मावळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू होते.

देहूरोड बाजारपेठेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्यासाठी बाजरपेठेतून फेरीही काढली. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद करणाऱ्या व्यापाऱ्यांनी काही वेळाने पुन्हा दुकाने उघडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नाणे मावळ,आंदर मावळ व पवन मावळ आदी भागात दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या वतीने आज बुधवारी मावळ बंदची हाक दिली होती.

नेवाळे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी, गोवित्री येथे बनावट नाव नोंदणी केल्याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर नेवाळे यांना अटकही झाली. त्यांना गुरुवार (दि.25) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यावर आक्षेप घेत भाजप नेत्यांनी नेवाळे यांच्यावर लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगून मावळ बंदची हाक दिली होती.

तसेच महाविकासआघाडी सत्तेचा गैरवापर करून दडपशाही करत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून केवळ भाजपचे दुकान सुरू करण्यासाठी मावळ बंदची हाक दिली आहे असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावे, असे आवाहनही केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.