Maval News : भाजपचा बालेकिल्ला महाविकास आघाडीकडून उध्वस्त – आमदार सुनील शेळके, यशाची कमान उंचावल्याचा भाजपचा प्रतिदावा

एमपीसी न्यूज – उर्से व कामशेत या मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील भाजपची सत्ता जाऊन तेथे महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. दरम्यान, भाजपचा मावळ हा बालेकिल्ला महाविकास आघाडीने उध्वस्त करीत 49 पैकी 40 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केला आहे.

तर मावळचा गड शाबूत राखत उलट मागील वेळेपेक्षा जास्त म्हणजे 57 पैकी 39 ग्रामपंचायतीत भाजप आणि आरपीआय युतीचा विजय झाल्याचा प्रतिदावा माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे आणि भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी केला आहे.

मावळातील 57 पैकी आठ ग्रामपंचायती बिनिविरोध झाल्याने 49 ठिकाणी मतदान झाले. शेळके यांनी विधानसभेला मावळ हा भाजपचा बालेकिल्ला उध्वस्त केला. त्यानंतर झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीच विजयी झाल्याचा दावा त्यांनी निकालानंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे तो त्या-त्या ग्रामस्थांचा विजय आहे. त्या ग्रामपंचायतींवर आम्ही दावा केलेला नाही. त्याप्रमाणे भाजप किंवा अन्य कोणीही दावा करू नये, असे आमदार शेळके म्हणाले.

80 टक्के ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून तेथे पूर्वी भाजपची सत्ता होती, अशी माहिती त्यांनी दिली. तर, मावळातील जनतेने भाजप, आरपीआय युतीला कौल दिला असून 482 पैकी 272 ग्रामपंचायत सदस्य हे भाजपचे निवडून आले असल्याचा दावा रवींद्र भेगडे यांनी केला आहे. बिनविरोध झालेल्या आठपैकी चार मिळून एकूण 39 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला. गहूंजे, नवलाख उंबरेसारख्या ठिकाणी नव्याने सत्ता येऊन या आणखी काही गावांतही सत्ता आल्याचे त्यांनी सांगितले. फक्त कामशेत हातातून निसटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

गतवेळी 23 ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. यावेळी हा आकडा 39 झाल्याने भाजपच्या यशाची कमान वाढतीच असल्याचे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.