Maval News: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत स्थगित – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यात प्रथमच तळेगाव एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे नववर्षदिनी आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी रात्री दिली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विनंतीनुसार ही शर्यत स्थगित करण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतींबरोबरच आपल्याला प्रत्येक जीव महत्वाचा आहे, असे शेळके यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत येत्या शनिवारी (एक जानेवारी) तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार होती. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे नाणोलीच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी बैलगाडे धावणार होती.

अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने बैलगाडा मालक व शौकिनांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, तथापि ऐनवेळी शर्यत रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरेमोड झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.