Maval News : देवनागरीच्या संवर्धनासाठी वडेश्वर येथे सुलेखन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – देवनागरी लिपीचे संवर्धन व्हावे तसेच शास्त्रीयदृष्ट्या लेखन कसे करावे या उद्देशाने मावळ तालुक्यातील वडेश्वर येथे सुलेखन कार्यशाळा घेण्यात आली. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे सोमवार (दि 30) आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती मावळचे शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज, खडकाळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, वडेश्वर केंद्राचे केंद्रप्रमुख रघुनाथ मोरमारे, खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख गंगाराम केदार, तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर भालेराव, उमेश माळी, खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे आदी उपस्थित होते.

अक्षरातील वळण, सुंदरता, बारकावे यावरून व्यक्ती स्वभाव देखील परिचित होतो, लेखनातील बारकावे कसे सुधारावे याविषयी सुदाम वाळुंज यांनी मार्गदर्शन केले.

सुंदर हस्ताक्षर विद्यार्थ्यांना कसे उपयुक्त ठरेल, त्यासाठी शिक्षकांचे अक्षर कसे असावे याबाबत कृष्णा भांगरे यांनी सूचना केल्या.

कार्यशाळेचे तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर भालेराव व उमेश माळी यांनी प्रत्यक्ष कृतीतून हस्ताक्षरातील बारीकसारीक बाबींविषयी मार्गदर्शन केले. बोरुच्या साहाय्याने लेखन करताना प्रशिक्षणार्थी शिक्षक आनंदून गेले. या कार्यशाळेत खांडी व वडेश्वर केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ मोरमारे यांनी केले. सूत्रसंचालन उमेश माळी यांनी तर आभार श्रीमती सुवर्णा वाडीले यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन वडेश्वर शाळेतील सुनिल साबळे, वनिता राजपूत, स्वप्नाली नाईक, कुंडलिक लोटे, पुनम तनपूरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.