Maval News : ग्रामपंचायतीच्या वर्चस्वावरून राष्ट्रवादी, मित्रपक्ष आणि भाजप नेत्यांकडून परस्परविरोधी दावे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या वर्चस्वावरून राष्ट्रवादी व मित्रपक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून परस्परविरोधी दावे- प्रतिदावे करण्यात आल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 57 पैकी 41 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी 29 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा प्रतिदावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील 29 जागांसाठी बुधवार (दि 24) रोजी तर 28 जागांसाठी गुरूवार (दि 25) रोजी निवडणूक प्रक्रिया झाली. त्याचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर या निवडणुकीतील यशाबद्दल राष्ट्रवादी व मित्रपक्ष आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या 41 जागांवर सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत.

राज्यात महाआघाडीचे सरकार असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. आणि मावळचा आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याने विकास राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते त्यामुळे सरपंच, उपसरपंचाच्या रूपाने जनतेने कौल दिल्याचे आर्वजून भेगडे यांनी सांगितले.

पुढील काही दिवसांत नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यावेळी सरपंच संख्या किती आहे हे समक्ष दाखवून देऊ असे भेगडे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी राष्ट्रवादीचा दावा फेटाळून लावत ग्रामपंचायतीच्या नावासह विजयी सरपंच व उपसरपंच त्यांच्या पक्षाचे असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान भेगडे यांनी दिले. भाजपचा 29 ग्रामपंचायतीवर दावा असलेले सर्व सरपंच आम्ही म्हणू त्याठिकाणी, कोणत्याही वेळी उभे करू शकतो.

आरोप प्रत्यारोपामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसून गावकी, भावकी, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या एकोप्यातून गावाच्या विकासासाठी पॅनेल उभे केले जातात त्यामधून निवडणूका लढल्या जातात.

राजकीय पक्षांनी विकासासाठी श्रेयवाद जरूर करावा. ज्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, त्यांनी ग्रामपंचायतीवर श्रेयासाठी दावे – प्रतिदावे करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असा अनेक गावांतील ग्रामस्थांमध्ये चर्चेचा सूर आहे.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी नेतेमंडळींनी निधी मिळवून देण्यासाठी स्पर्धा करावी व श्रेय घ्यावे असे जाणकांरांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.