Maval News : तालुका आरोग्याधिकारी डाॅ. लोहारे व तळेगावचे मुख्याधिकारी झिंजाड यांनाही कोरोना संसर्ग

एमपीसी न्यूज – मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पाठोपाठ तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे व आता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. काल (सोमवारी) त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर  वाढला आहे.  आता त्याचा शिरकाव जनतेच्या कायम संपर्कात असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतही झाला आहे.

गेल्या दोन सप्टेंबरला तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. शनिवारी (दि 5) रोजी थोडासा त्रास जाणवत असल्याने तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच दिवशी सायंकाळी त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

काल सोमवारी दि 7 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना  कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने  अँटीजेन टेस्ट केली असता, कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

झिंजाड हे आयसोलेशनमध्ये असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

एकूणच तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी वर्गालाच संसर्ग झाल्याने प्रशासकीय यंत्रणाच विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.म्हणूनच या यंत्रणेतील प्रमुखच कोरोनाच्या संसर्गाच्या विळख्यात सापडल्याने या यंत्रणेला हादरा बसला आहे.

कोरोना संकट सुरू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांपासून तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे व तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सतत कार्यरत होते. झिंजाड यांनी नगरपरिषद हद्दीतील कोरोनाची परिस्थिती अत्यंत सुंदर रितीने हाताळली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.