Maval News : कुसगाव बुद्रुकच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार; प्रांताधिकारी शिर्के यांच्या चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक गावच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असून यासाठी प्रांताधिकारी संदेश शिर्के जबाबदार आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी शिर्के यांच्या कारभाराची चौकशी करावी. तसेच कुसगाव बु गावात पोलीस पाटील म्हणून योग्य उमेदवाराची नियुक्ती करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

याबाबत नाईक यांनी निवेदन दिले आहे. सन 2017 मध्ये कुसगाव बु. गावच्या पोलीस पाटील पदावर भरती करण्यात आली. या भरतीमध्ये सदाशिव विनायक सोनार हा उमेदवार प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याची कुसगाव बु. गावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र, सोनार या उमेदवाराने चुकीच्या मार्गाने हे यश मिळवले असून या निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे.

याबाबत तक्रार केल्यानंतर उपविभागीय अधिका-यांनी सोनार यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर सोनार यांनी नियुक्ती रद्दच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्याकडे अपील केले होते. मात्र न्यायालयाने सोनार यांचे अपील फेटाळून लावले.

_MPC_DIR_MPU_II

शासन निर्णयानुसार निवड सूची जाहीर झाल्यापासून एक वर्षासाठी संबंधित पद वैध राहते. एक वर्षानंतर निवड सूची व्यपगत होते. कुसगाव बु. गावच्या पोलीस पाटील पदाच्या निवडसूचीला एक वर्षाहून अधिक कालावधी झाला असल्याचे कारण सांगून उपविभागीय कार्यालयाने निवड यादीत दुस-या क्रमांकावर असलेले किसन गुंड यांना नियुक्ती देण्यास नकार दिला.

या संपूर्ण प्रकरणात कुसगाव बु गावचे पोलीस पाटील पद रिक्तच राहिले. मागील काही वर्षांपासून गावाला पोलीस पाटील नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रांताधिकारी शिर्के जबाबदार असून त्यांच्या कारभाराची चौकशी करावी तसेच त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणाबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहिले आहे. त्यात योग्य ती कार्यवाही करून किसन गुंड यांना पोलीस पाटील म्हणून नियुक्त करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.