Maval News : गोपीचंद पडळकर यांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का ? – आमदार सुनील शेळके

0

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर असे बेताल वक्तव्य करीत आहेत, असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. पडळकर यांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का, असा सवाल करीत आमदार शेळके यांनी पडळकर यांना टोला लगावला आहे.

आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का, अशा आशयाची टीका पडळकर यांनी सांगली येेथे पत्रकारांशी बोलताना केली. त्याचा योग्य शब्दांत समाचार आमदार शेळके यांनी घेतला. कोरोना प्रतिबंधासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विषयी पातळी सोडून बेताल वक्तव्य करणे म्हणजे कोरोनामध्ये लढणाऱ्या योद्ध्यांची चेष्टा केल्यासारखेच आहे, असे शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बिरोबाची खोटी शपथ घेताना पडळकर यांनी गांजा ओढला होता का, असा प्रतिहल्ला आमदार शेळके यांनी चढविला आहे. आज राज्याची परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे, कोरोनाचा हाहाकार चालू असताना अशा प्रकारची टीका करू नये. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह राज्यातील सर्व आरोग्ययंत्रणा स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केलेली बेताल वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला आहे.

पडळकर यांना फक्त प्रसिद्धी मिळवण्यात रस असल्याने ते टीका करताना दिसत आहेत. बेताल वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविण्यात ते माहीर आहेत. त्यांनी टीका जरूर करावी, मात्र टीका करताना तोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रावरील संकटाच्या काळात मदत करणे शक्य नसेल तर किमान जिभेला लगाम लावावा, असा सल्लाही शेळके यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment