Maval News : मावळातील माध्यमिक शाळांना वृक्षरोपांचे वाटप

एमपीसी न्यूज – विधीमंडळातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रत्येकी पाच देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.

रविंद्र आप्पा भेगडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संपतराव गावडे यांचे हस्ते व मावळ माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली आदर्श विद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना भेगडे म्हणाले पर्यावरणासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे. मागणी केल्यास शाळांना अधिक वृक्षरोपे मिळतील. तसेच शाळेतील गरीब व होतकरु विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचीही मदत देत आहोत. याबाबत मुख्याध्यापक संघाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी संपतराव गावडे, राजेश गायकवाड, एस.एन.गोपाळे व भाजप तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करुन रविंद्र भेगडे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले.

यावेळी रविंद्र भेगडे यांचा सत्कार करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मच्छिंद्र केदारी, मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त बी. एम. भसे व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य प्रकाश शिंदे यांनी केले, तर आत्माराम मोरे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.