Maval News : तुम्हाला बेड हवाय, प्लाझ्मा हवाय? फक्त माहिती द्या, मदत झालीच म्हणून समजा…
सामाजिक कार्यकर्ते अतुल राऊत कोरोना काळात अविरत धडपडणारा अवलिया
एमपीसी न्यूज – कोणाला बेड हवाय, कोणाला प्लाझ्मा हवाय ? फोनच नाही तर फक्त मॅसेज करा, तो तुमच्या मदतीला धावून येईल. सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असलेला व कोरोना महामारीच्या संकटातही 24 x 7 रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावणाऱ्या वडगाव येथील अतुल राऊत या अवलिया तरुणामुळे अनेकांना मोलाची मदत होताना दिसत आहे.
अतुल राऊत.. वडगाव मावळ येथील हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून स्मित कला रंजन, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान, मावळ सोशल फाउंडेशन, मावळ विचार मंच, डोळसनाथ नागरी पतसंस्था अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन पक्षाने राऊत यांना थेट महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. राजकारणात सक्रिय असताना संबंधित संस्थांच्या माध्यमातून राऊत हे 100 टक्के सामाजिक कार्यात सक्रिय असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
इंटरनेट सुविधा, ऑनलाईन प्रक्रिया बाबत असलेल्या उत्तम कौशल्याच्या जोरावर राऊत यांनी सोशल मीडियावरही आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. कोरोनाच्या या महामारीतही त्यांनी या आपल्या कुशल्याचा वापर करून आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे.
महामारीच्या काळात लोक जेव्हा मिस यु, भावपूर्ण श्रद्धांजली, घरीच रहा सुरक्षित रहा, यांसह नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग, गुडनाईटचे मॅसेज टाकण्यात व्यस्त असतात, त्यावेळी अतुल राऊत यांनी अमुक व्यक्तीला बेड पाहिजे, अमुक व्यक्तीला प्लाझ्मा पाहिजे, प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या अशा प्रकारचे मॅसेज टाकून रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना मदत करायला सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपासून यामाध्यमातून 24×7 अविरतपणे कार्यरत राहून केवळ सोशल मीडियाच नव्हे तर प्रसंगी रात्री अपरात्री स्वतः रुग्णालय, ब्लडबँक, प्लाझ्मा सेंटर याठिकाणी जाऊन मदत करण्याचा प्रयत्न राऊत हे करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा ठरत आहेत.
तरुणाईसाठी आदर्श !
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात तरुण वर्गाकडून प्रामुख्याने मनोरंजनावर भर दिला जातो. परंतु अतुल राऊत सारखे तरुण त्याच सोशल मीडियाचा वापर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी करत आहेत. काही तरुणांनी मावळचे कोरोना योध्ये या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला आहे. हे कार्य खऱ्या अर्थाने तरूणाईसाठी आदर्शवत ठरत आहे.