Maval News : मायमर रुग्णालयात ढिसाळ कारभारामुळे घडलेल्या घटनांची चौकशी करून कारवाई करावी – बाळासाहेब ढोरे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात ढिसाळ कारभारामुळे घडलेल्या घटनांची चौकशी करून कारवाई करावी व शासनाच्या आरोग्य विभागाने हे रुग्णालय ताब्यात घ्यावे, अन्यथा मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाची मागणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरेसह युवक अध्यक्ष विलास मालपोटे, वडगाव शहर अध्यक्ष गोरख ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, संपत दाभाडे, नगरसेवक राजेंद्र कुडे, विलास विकारी, गणपत भानुसघरे, महेश मालपोटे, गोरख असवले, सुधीर भोंगाडे, काळूराम असवले, सौरभ ढोरे, अमोल दाभाडे, समीर भोर, नवनाथ शेलार, उमेश थिटे, शेखर बोडके, सुमीत ढोरे आदीजण निवेदन देताना उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात खूप वर्षापासून कार्यरत असणा-या मायमर रूग्णालयात गेल्या काही दिवसांत हाॅस्पिटल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने रूग्णांचा मृतदेह बिलाअभावी नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने गंभीर प्रकार घडला होता. त्याबाबत गुन्हाही दाखल झाला आहे.

याशिवाय रूग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरणे, योग्य उपचार न करणे, कोविड 19 रूग्णांना वाढीव बील देणे असे प्रकार वारंवार घडत असून नुकतीच एका रूग्णाने रूग्णालयात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी समोर आल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

त्यामुळे हे रूग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ताब्यात घ्यावे. अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने शासनाने योग्य तो निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने हाॅस्पिटल विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.