Maval News: आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले

आदिम कातकरी सेवा अभियानांतर्गत कातकरी बांधवांना जातीचे दाखले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कातकरी बांधवांना आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने जातीचे दाखले मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात 1,235 दाखल्यांचे घरपोच वाटप करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी आमदार शेळके यांनी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांचे अर्ज भरून घेतले होते. कातकरी बांधव डोंगररांगा असलेल्या मावळ तालुक्यात मासेमारी व हंगामी कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशिक्षित कातकरी समाज विकासापासून वंचित राहिला आहे. आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहेत.

मात्र, शासकीय कागदपत्रांची पूर्तता करताना केवळ जातीचे दाखले नसल्याने कातकरी असूनही अनेक योजनांचा लाभ अनेकांना मिळत नव्हता.

कातकरी समाजाची ही समस्या ओळखून आमदार शेळके यांनी पुढाकार घेत कार्यालय प्रतिनिधींना प्रत्येक वाडी- वस्तीवर जाऊन अर्ज भरून घेण्यास सांगितले. सुमारे दोन हजार चारशे अर्ज भरून घेण्यात आले होते.

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कान्हे येथे दाखले वाटप करण्यात आले. इंगळुण,सावळा, डाहुली, फळणे, सदापूर, वाकसई, कुसगाव, पाथरगाव, पाटण, उकसान, गोवित्री आदी गावांमधील कातकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात 1,235 दाखल्यांचे घरपोच वाटप करण्यात आले.

कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्याची असणारी गरज ओळखून वाडीवस्तीवर जाऊन अर्ज भरून घेतले. व प्रशासनाकडे पाठपुरावा करुन पात्र ठरलेल्या सर्वांचे दाखले मिळाले आहेत. त्यामुळे प्रयत्नांबरोबरच अडचणींवर मात करणे शक्य झाले, असे आमदार शेळके यांनी या प्रसंगी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, प्रकाश पवार, बाळासाहेब भानुसघरे, तानाजी दाभाडे, गजानन शिंदे, कान्हे सरपंच विजय सातकर, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, राजेश वाघुले, दत्तात्रय चोपडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष नवनाथ चोपडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III