Maval News: महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा : आमदार शेळके

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य गरजू नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. परंतु मावळ तालुक्यातील सर्वसामान्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी अधिक प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी आग्रही सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत केली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक कौन्सिल हॉल पुणे येथे झाली. त्यात आमदार शेळके यांनी ही सूचना केली. बैठकीस जिल्हाधिकारी राजेश देशमुख,तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व वैद्यकीय अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील अनेक पात्र असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. अधिकाऱ्यांकडूनही याबाबत योग्य प्रतिसाद मिळत नाही. अनेक पात्र रुग्ण योग्य माहिती मिळत नसल्यामुळे योजनेच्या लाभांपासून वंचित आहे, ही बाब निराशाजनक आहे.

योजना उपलब्ध असलेल्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांबरोबरच तालुक्यातील वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता याचा फटका गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा, यासाठी रुग्णालयांकडूनही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ऐनवेळी रुग्णाच्या नातेवाईकांना आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले जाते, अशी तक्रार आमदार शेळके यांनी केली.

योजना अंमलबजावणीसाठी नियम, बदल इत्यादी अद्ययावत माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना आधीच उपलब्ध केली पाहिजे, अशी सूचना शेळके यांनी यावेळी केली.

कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण, वैद्यकीय सुविधा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.