Maval News : स्वयंसहाय्यता गटासाठी तालुकास्तरीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत अनेक महिला बचतगटाच्या माध्यमातून काम करीत आहेत. लॉकडाउन नंतर उद्योग क्षेत्रात झालेल्या घडामोडी पाहता तालुक्‍यातील स्वयंसहायता गट अधिक सक्षम करण्यासाठी स्वयंसहायता गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे शासकीय विश्रामगृह येथे स्वयंसहाय्यता गटातील महिलांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके म्हणाले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील महिलांना उद्योगातून सक्षम करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. उमेद या नावाने हे अभियान राज्यभर सुरू असून उमेदचा अर्थ महिलांच्या कर्तृत्वाला चालना देणारी, मनाला उभारी देणारी गोष्ट असा आहे. मावळ तालुक्यातील महिला केंद्रस्थानी ठेवून सुरु केलेल्या या अभियानामुळे ग्रामीण भागात अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.

या अभियानांतर्गत गरजू महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक व मानसिक दृष्ट्या स्थैर्य प्राप्त करून देत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांनी सक्रियपणे काम करणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना काळात महिला बचत गटांची उलाढाल ठप्प झाली होती. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुकास्तरीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध वस्तूचे उत्पादन होऊन त्याची विक्री होण्यास त्यामुळे मदत मिळेल. बचत गटाच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी फिरते प्रदर्शन व्हावे, प्रत्येक गावात त्यांना विविध प्रशिक्षण वर्ग बैठकांसाठी सभागृह उपलब्ध होणे गरजेचे आहे. अशा विविध समस्यांवर काम करून महिला सक्षमीकरण यासाठी मी प्रयत्नशील आहे असे आमदार सुनील शेळके यांनी अभियानाला मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका अभियान व्यवस्थापक सुभाष गायकवाड, पंचायत समितीचे पदाधिकारी व स्वयंसहाय्यता गटातील महिला उपस्थित होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.