Maval News: तालुक्यातील 711 कोटींच्या विकासकामांना निधी- सुनील शेळके

आगामी काळात 1500 कोटींची विकासकामे प्रस्तावित

एमपीसी न्यूज – मावळच्या जनतेने मोठ्या विश्वासाने आमदारकीची जबाबदारी सोपविली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून मावळ मतदारसंघासाठी तब्बल 711 कोटी 23 लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरीसह निधी मिळवण्यात आपल्याला यश मिळाले आहे. मागील पंचवार्षिकमधील मंजूर  कामांनाही महाविकास आघाडी सरकारने 64 कोटी 22 लाख रुपयांचा प्रत्यक्ष निधी दिला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळात सुमारे 1500 कोटी रुपयांची विविध विकासकामे प्रस्तावित असून पुढील साडेतीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करून तालुक्याचा सर्वार्थाने कायापालट करण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, देहूरोड शहराध्यक्ष अॅड कृष्णा दाभोळे, लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जीवन गायकवाड, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, महिला तालुका राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत, उपाध्यक्षा शैलजा काळोखे, नगरसेवक संतोष भेगडे,  वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, तळेगाव नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका मंगल भेगडे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनीता काळोखे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील दाभाडे, संघटनमंत्री नारायण ठाकर, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सरपंच विजय सातकर, सरपंच सचिन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके सर्व विकासकामांची यादी मंजुरीच्या पत्रांसह सादर केली. यात 2020-21 वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पात मावळातील विकासकामांसाठी 48 कोटी 26 लाख रुपयांची तरतूद तर 2021-22 च्या अर्थसंकल्पात 85 कोटी 06 लाख रुपयांची तरतूद आहे.

नगरपरिषद व नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण योजनांअंतर्गत तळेगाव नगरपरिषदेसाठी चार कोटी, लोणावळा नगर परिषदेसाठी तीन कोटी व वडगाव नगपंचायतीसाठी साडेतीन कोटी अशा एकूण साडेदहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असून या व्यतिरिक्त ठोक तरतूद निधी अंतर्गत आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागामार्फत पवना नदीवरील पूल व बंधाऱ्यांसाठी 53 कोटी 13 लाख रुपये खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात गहुजे, शिवणे, कडधे, थुगाव, बेबेडओहोळ, गोडुंब्रे तसेच इंद्रायणी नदीवरील बुधवडी, सांगिसे, पिंपळोली, टाकवे बुद्रुक, राजापुरी, नाणे, देहू येथील कामांचा तसेच वडिवळे कालवा बंदिस्त पाईनलाईनच्या कामाचा समावेश आहे.

केंद्रीय रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्या वतीने कान्हे रेल्वे उड्डाणपुलासाठी 57 कोटी रुपये तसेच मळवली रेल्वे उड्डाणपुलासाठी 57 कोटी रुपये अशा एकूण 114 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 71 कोटी 71 लाख रुपयांचा निधी, 4 कोटी 73 लाख रुपये आमदार स्थानिक विकास निधी, एक कोटी रुपये आमदार डोंगरी विकास निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांसाठी 10 कोटी 72 लाख रुपये, महाराष्ट्र जीवन प्रादेशिक पाणी योजनांसाठी 40 कोटी 41 लाख, पीएमआरडीएकडून सहा कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधण्यासाठी 40 कोटी 94 लाख रुपये तर कान्हे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काले कॉलनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीचे काम एक कोटी 80 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सोयी-सुविधांसाठी एक कोटी रुपये तसेच दोन रुग्णावाहिकांसाठी 34 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

जवण-शिळिंब-घुसळखांब रस्ता सुधारणेसाठी 25 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उरण -भीमाशंकर रस्त्यासाठी मावळ तालुक्यातील भूसंपादन सर्वेक्षणासाठी पाच कोटी रुपये, तळेगाव-चाकण रस्त्याची इंदोरी हद्दीपर्यंत सुधारणा करण्यासाठी सहा कोटी रुपये, टाकवे बुद्रुक येथे इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी नऊ कोटी रुपये, केंद्रीय रस्ते विकास निधीतून वडगावमधील अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी चार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

तळेगाव दाभाडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान डागडुजी व दुरुस्तीसाठी एक कोटी 12 लाख रुपये, देहूरोड येथील धम्मभूमी सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वडगाव सत्र न्यायालय इमारतीची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी 65 लाख रुपये, लोणावळा पोलीस स्टेशन इमारतीसाठी भूसंपादन करण्यासाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करवून घेतली आहे.

मंजूर झालेल्या 711 कोटी 23 लाखांच्या निधीत समाविष्ट नसलेला आणखी 64 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मावळ तालुक्याला प्राप्त झाल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. कोविड व लॉकडाऊन काळात तीन कोटी आठ लाख रुपये, निसर्ग चक्रीवादळ नुकसानभरपाई पोटी 24 कोटी रुपये, विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून दोन कोटी 48 लाख रुपये, आंबी एमआयडीसी मुख्य रस्त्यासाठी एमआयडीसी निधीतून 19 कोटी 56 लाख रुपये, आंबी येथे इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी मागील पंचवार्षिक योजनेतील कामासाठी चालू वर्षी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

शिवणे-सडवली दरम्यान पवना नदीवर पूल बांधण्यासाठी चालू वर्षी पाच कोटी 71 लाख रुपयांचा निधी तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सिद्धीविनायक नगरी  येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी या वर्षी चार कोटी 39 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचा  711 कोटी 23 लाखांच्या निधीत समावेश नाही, असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

मागील पंचवार्षिकमधील कामशेत उड्डाणपूल, आंबी पूल, शिवणे-सडवली पूल, देहूरोड पाणी योजना, चांदखेड-बेबेडओहोळ-उर्से रस्ता, कुसगाव-पवनानगर, जवण-शिळिंब रस्ता तसेच देहूरोड रेल्वे उड्डाणपूल व रस्ता या कामांचा पाठपुरावा केल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी कार्ला – एकविरा देवी मंदिर व लेणी विकास आराखड्यासाठी 90 कोटी रुपये, वडगाव येथे महसूल भवन ही प्रशासकीय इमारत व पोलीस स्टेशन उभारणीसाठी 21 कोटी 4 लाख रुपये, आयटीआय इमारत दुरुस्ती व सुधारणेसाठी अडीच कोटी रुपये, तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणास मंजुरी, श्रीक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर, वडगाव येथे जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी, तालुक्यातील उपेक्षित कातकरी समाजास 2109 दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याच्या कामांचा आमदार शेळके यांनी आवर्जून उल्लेख केला.

तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांसाठी 27 कोटी 29 लाख रुपये, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी 66 कोटी 6 लाख रुपये, वडगाव नगरपंचायती क्षेत्रातील विकासकामांसाठी 18 कोटी 18 लाख रुपये, देहू नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी 16 कोटी 85 लाख रुपये तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील विकासकामांसाठी सात कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून दिला आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

प्रस्तावित प्रमुख विकासकामे

तळेगाव-चाकण रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 300 कोटी रुपये मंजूर झाले असले तरी वडगाव फाटा ते सुदुंबरे या टप्प्यासाठी एकूण खर्चाची रक्कम निश्चित नसल्याने ती 717 कोटींमध्ये समाविष्ट नाही, असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले. कार्ला लेणी-एकविरा देवी मंदिर परिसर विकासाचा 90 कोटींचा आराखडा प्रस्तावित आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना 164 गावे व वाड्या-वस्त्यांसाठी मंजूर असली तरी गावनिहाय रक्कम निश्चित नसल्याने त्या 158 कोटींचा समावेश देखील एकूण मंजूर निधीत केलेला नाही, असे शेळके यांनी सांगितले.

पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटा, वडगाव फाटा, तळेगाव लिंब फाटा, सोमाटणे फाटा व देहूरोड बाह्यवळण रस्ता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा 400 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली. लोणावळा टायगर पॉईंट येथे स्काय वॉक बांधण्याचा 30 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प, मावळ तालुका पातळीवर नाट्यगृह बांधण्यासाठी 15 कोटी रुपये, तळेगाव नगरपरिषद हद्दीत क्रीडा संकुल बांधण्यासाठी आठ कोटी रुपये यासह सुमारे 1500 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प प्रस्तावित असून येत्या साडेतीन वर्षात ही सर्व कामे प्रत्यक्षात आल्याचे मावळवासीयांना पहायला मिळेल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.

पवना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणे, बंद जलवाहिनी आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी मिळवून देणे, मावळ तालुक्यात पर्यटनवाढीसाठी तसेच स्थानिक रोजगारवाढीसाठी प्रयत्न करणे, तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे, शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले यांचे वाटप यासाठीही प्राधान्याने काम करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.

कामाचे श्रेय सर्वांना – आमदार शेळके
मावळच्या विकासासाठी आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल आमदार शेळके यांनी महाविकास आघाडी सरकारचे विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार तसेच सर्व संबंधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांचे विशेष आभार मानले. मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे सांगत या आमदार शेळके यांनी सर्व कामांचे श्रेय त्यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.