Maval News : तळेगावकरांवर लादलेला सहा दिवसांचा लॉकडाऊन त्वरित रद्द करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 7 मे पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याबाबत मावळ – मुळशीचे नवनियुक्त प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या आदेशाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संंतापाची भावना असून त्वरित हा लॉकडाऊन रद्द करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नाईक यांनी या विषयी लेखी निवेदन दिले. 7 ते 12 मेे दरम्यान सकाळी 7 ते 9 हे दोन तास सोडल्यास उर्वरित बावीस तास कडक लॉकडाऊन तळेगाव परिसरात असणार आहे. त्यात अत्यावश्यक सेवांना देखील सूट नाही. भाजीपाला, दूध, फळे अन्न धान्य विक्रेेत यांच्यावर देखील कारवाई होऊ शकतेे, हा प्राांताधिकारी यांचा आदेश मनमानी व अन्याय्य असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. ‍

तळेगाव परिसरात कोरोनाची स्थिती गंभीर स्वरूपाची नाही. शेजारच्या पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहर परिसर वास्तविक दाट लोकवस्ती असलेला भाग आहे. तेथे देखील मृत्यूदर घटलेला आहे. नवीन रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या तुलनेत विरळ लोकवस्ती असलेल्या भागात लॉकडाऊन करण्याची भाषा प्रांताधिकारी करीत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला आहे.

आधीच गोरगरीबांना नोकरी, रोजगार नाही, हातात पैसा नाही पोटात पुरेसे अन्न नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. एक वर्षापासूनच्या सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातात पैसा नाही म्हणून अन्न नाही. घरभाडे द्यायला पैसे नाही म्हणून निवारा नाही. जिथे रहायला घर नाही आणि पोटाला अन्न नाही तिथे कपड्याचे काय घेऊन बसलात, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.

अन्न, वस्त्र आणि निवारा तुमचे शासन, गोरगरिबांना देऊ शकत नसाल तर तुम्ही शासन चालविण्यास नालायक आहात. कोणाच्या घरात आज कित्येक दिवसापासून चूल पेटलेली नाही. हे पहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याच्या घोषणेला एक महिना झाला. तुमच्या शासनाला त्याचा देखील विसर पडला आहे, ही सर्व वस्तुस्थिती आहे, अशी खंतही नाईक यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर आपण लॉकडाऊनला विरोध करणार आणि गरीबांच्या पाठीशी उभा राहणार, भले याची कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, असा निर्धार नाईक यांनी बोलून दाखविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.