Maval News: मावळात उद्या पोल्ट्री संघटनेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पोल्टी व्यावसायिक संघटनेचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुक्रवार  (दि 2) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात येत असून यावेळी मावळ तालुक्यातील विशेष कर्तृत्व संपन्न पोल्ट्री फार्मरचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यात साधारणपणे एक हजार पोल्ट्री फार्म असून गेली 17 वर्षे मावळातील विविध भागात शेतकरी शेती पूरक म्हणून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत.

सतरा वर्षापूर्वी पहिले पोल्ट्री फार्म सुरू करणारे बधलवाडी येथील मारूती बधाले तसेच मावळातील सर्वात मोठे पोल्ट्री उद्योजक संग्राम काकडे आणि सर्वोत्कृष्ट पोल्ट्री उद्योजक सचिन पवार यांचा पोल्ट्री संघटनेमार्फत याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक, संघटनेचे प्रमुख संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

हा कार्यक्रम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी माऊली तथा ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे  कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर हे उपस्थित राहणार आहेत.

कोरोना विषाणू संसर्गामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला होता. त्यामुळे अनेक पोल्ट्री फार्म वाल्यांनी आपले पोल्ट्री फार्म बंद केले होते. त्या सर्वांना पुन्हा उर्जितावस्था यावी तसेच त्यांना व्यावसायिक अडचणी समजावून सांगण्यात याव्यात म्हणून ही मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटना स्थापन केली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये घेण्यात येणारा हा उद्घाटन समारंभ  शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार (दि 2) ऑक्टोबर रोजी तळेगाव स्टेशन येथील मावळ अ‍ॅग्रोच्या कार्यालयांमध्ये सकाळी 11 वाजता  होणार असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक सोनबा गोपाळे (गुरूजी) यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.