Maval News: गोळीबारातील जखमींना नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी माझी – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – गेल्या दहा वर्षात झालेले राजकरण बाजूला ठेऊन स्थानिक भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी हातात हात घेऊन काम करू, हीच खरी पवना गोळीबारातील शहिदांना श्रद्धांजली असेल’, असे मत आमदार सुनील शेळके यांनी आज व्यक्त केले. गोळीबारातील जखमींना नोकरी मिळवून देणे, ही आपली व राज्य शासनाची जबाबदारी आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

पवना बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनाच्या वेळी झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांना आमदार शेळके यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

त्यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, गोळीबाराच्या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाली. येथील शेतकरी बांधवांची मागणी आहे की जखमी बांधवांना सरकार किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नोकरी पाहिजे तसेच, ही बंदिस्त जलवाहिनीला देखील बंद झाली पाहिजे.’

मागील दहा वर्षापासून काही मंडळी वस्तुस्थिती लपवून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप शेळके यांनी केला. लोकप्रतिनिधी या नात्याने मागील दीड वर्षापासून जखमी बांधवांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत आहे. जखमींना नोकरी मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी सभेत प्रस्ताव मंजूर करून मागील काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे गेला असल्याचे शेळके यांनी यावेळी नमूद केले.

आमदार शेळके पुढे म्हणाले, ‘गोळीबारात जखमी असलेल्या बांधवांना नोकरी देण्याची जबाबदारी माझी व राज्य सरकारची असणार आहे. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू ठेवायचा का बंद करायचा, हा निर्णय शेतकरी बांधव घेतील. त्यात मी काही लक्ष घालणार नाही.

या दहा वर्षात झालेलं राजकरण बाजूला ठेऊन स्थानिक भूमीपूत्रांना न्याय देण्यासाठी हातात हात घेऊन काम करू, हीच खरी गोळीबारातील शहिदांना श्रद्धांजली असेल.’, असे आमदार शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.