Maval News: कान्हेफाटा, मळवलीत रेल्वे ओव्हरब्रिजचा मार्ग मोकळा – श्रीरंग बारणे

देहूरोड रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम दोन महिन्यात पूर्ण

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या कान्हेफाटा, मळवली रेल्वे स्थानक येथील रेल्वे उड्डाणपुलाचा (रेल्वे ओव्हरब्रिज) मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असून लवकरच ओव्हरब्रिजचे काम चालू होईल, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. तसेच देहूरोड रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम दोन महिन्यात पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व नागरिकांसाठी लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही त्यांनी रेल्वे अधिका-यांना केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पुणे विभागाच्या अंतर्गत येणा-या रेल्वेच्या समस्या, तक्रारींबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच रेल्वे अधिका-यांसोबत बैठक घेतली. बैठकीला रेल्वे बोर्डाचे सदस्य बशीर सुतार, पुणे क्षेत्रीय अधिक्षक रेणू शर्मा, सुरेश बाजपेयी, गौतम मिश्रा, विकास कुमार, जे. पी.   मिश्रा, जे. एन.  गुप्ता उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून देहूरोड रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ब्रिजचे काम चालू करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. येत्या दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे अधिका-यांनी दिले आहे.

त्याचबरोबर कान्हेफाटा आणि मळवलीत रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकार निम्मा हिस्सा देणार आहे.

यापूर्वी राज्य सरकारने तरतूद ठेवली नव्हती. आता शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ओव्हर ब्रिजच्या कामासाठी तरतूद ठेवली आहे. या कामाची प्रशासकीय कारवाई पूर्ण झाली आहे.

काम सुरु करण्यासाठी गेट बंद करावे लागणार आहे. त्याकरिता जिल्हाधिका-यांचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) लागते. त्यासाठी रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिका-यांना मी देखील पत्र देवून तत्काळ परवानगी देण्याची मागणी केली आहे.

एनओसी मिळाल्यानंतर कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लवकरच काम चालू होईल, असे बारणे यांनी सांगितले.

खासगी कंपनीच्या सीएसआर फंडातून पिंपरी रेल्वे स्थानकाची सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातून जाणा-या सर्व रेल्वे स्थानकांची सुधारणा करावी. त्यासाठी कंपन्यांकडून सीएसआर फंड घ्यावा. त्याकरिता आवश्यक ती मदत केली जाईल. कंपन्यांकडे पाठपुरावा केला जाईल.

रेल्वे प्रवासी संघटनेच्या समस्यांबाबतही सविस्तर चर्चा झाली. रेल्वेची प्रलंबित कामे, समस्या सरकारकडे पाठपुरावा करुन मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी रेल्वे अधिका-यांना दिले.

वडगांव, केशवनगर येथे रेल्वे अंडरपासचे काम चालू आहे. तिथे वीज वितरणचे पोल आहेत. पोल स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागत आहे. त्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून तीन महिन्यात काम पूर्ण होईल असे अधिका-यांनी सांगितले.

तसेच कामशेत येथे देखील रेल्वे अंडर पाससचे काम चालू आहे. त्याला काही स्थानिक नागरिकांनी हारकती घेतल्या आहेत. त्यामुळे रेल्वे अधिका-यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी. नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यावर तोडगा काढावा. नागरिकांची सहमती, त्यांना विश्वासात घेवून काम चालू करावे अशा सूचनाही खासदार बारणे यांनी दिल्या आहेत.

लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवा

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. लसीकरणही सुरु झाले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांसाठी लोकल सेवा पुन्हा सुरळीत करावी. त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावे, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी रेल्वे अधिका-यांना केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.