Maval News : अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह इंटरनेटअभावी वैद्यकीय अधिकाऱ्याची तारांबळ

आढले प्राथमिक आरोग्य केंद्रातील चित्र 

 एमपीसीन्यूज :  पवन मावळ भागातील आढले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे  कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने या केंद्रात एकच तारांबळ उडत आहे. 

मावळ तालुक्यातील आढले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अख्यत्यारीत  एकूण  27 गावांचा समावेश आहे.  बेबेडओव्हळ, धामणे, दारुंब्रे, चांदखेड, शिवणे, गहुंजे या गावामध्ये उपकेंद्र आहेत. आढले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक शिपाई, दोन आरोग्यसेविका, तसेच फार्मसी ऑफिसर व मलेरिया सुपरवायझर ही  पदे रिक्त आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप सूर्यवंशी यांनी दिली.

सध्या कोरोना लसीकरण करण्यासाठी रोज सुमारे तीनशेच्या दरम्यान नागरिक व महिला येत आहेत. यांचे लसीकरण करण्याअगोदर त्यांचे नाव नोंद करणे, आधार कार्ड तपासणे, जन्मतारीख लिहिणे इत्यादी कामे येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांनाच करावी लागतात.

तसेच इंटरनेटची सुविधा नसल्याने रात्री घरी गेल्यावर या सर्वांची नेटवरून रजिस्टर नोंद करून त्या लसीकरण केलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश टाकावे लागतात.

सध्या याठिकाणी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.  दिलीप सूर्यवंशी, डॉ. संजया जाधव,डॉ. निकिता आतकर,आरोग्य सहाय्यक रघुनाथ भांडेकर, शोभा शिंदे,कलार्क शिवाजी मोहळ कार्यरत आहेत. हा कर्मचारी स्टाफ अपुरा असून इंटरनेट उपलब्ध नसल्याने मोठी तारांबळ होत असल्याचे कर्माचा-यांनी सांगितले.

लसीकरणासाठी  जाण्या येण्याची मोफत व्यवस्था 

आढले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हद्दीतील  गावामधून लसीकरण  करण्यासाठी जाण्या येण्याची  तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्था सोमाटणे गावाचे माजी उपसरपंच नितीन मु-हे, सचिन मु-हे, काशिनाथ मु-हे, राकेश घारे, मनोज वाळूंज, अविनाश गराडे आदींनी  केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.