Maval News: पवनानगर परिसरात दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठेत पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी स्टोअरमध्ये अनिकेत कालेकर, संदीप दहिभाते आणि अन्य चार जण जबरदस्तीने घुसले.

एमपीसी न्यूज – पवनानगर परिसरातील एका दुकानात शस्त्रांच्या धाकाने दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी स्टोअरमध्ये घडली होती.

अनिकेत अशोक कालेकर (रा. काले कॉलनी, कामशेत रोड, पवनानगर, ता. मावळ), अमित मुकुंद शेलार (रा. काले कॉलनी, कामशेत रोड, पवनानगर, ता. मावळ, मूळ रा. न्यु मोदी खाना, पुना कॉलेजसमोर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठेत पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी स्टोअरमध्ये अनिकेत कालेकर, संदीप दहिभाते आणि अन्य चार जण जबरदस्तीने घुसले. कोयता, तलवारी, चाकू, रॉड यांचा धाक दाखवून आरोपींनी बेकरीमध्ये असलेले गुलाम बारिष खान यांना 10 हजार रुपयांची खंडणी मागितली.

पैसे न दिल्यास कापून टाकण्याची धमकी दिली. खान यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी बेकरीच्या काउंटरमधून जबरदस्तीने 7 हजार रुपये काढून घेतले. हत्यारांनी बेकरीचे काऊंटर, केक काऊंटर, दोन फ्रिज यांची तोडफोड करून नुकसान केले.

याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सोबत स्थानिक गुन्हे शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रीकांत माळी, विजय पाटील, पोलीस कर्मचारी प्रकाश वाघमारे, राजेंद्र चंदनशिव, गणेश महाडिक, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब खडके, दगडू वीरकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.