Maval News : राम भोते यांच्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे पारितोषिक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील परंदवडी येथील राम बबन भोते यांनी बनवलेल्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून पारितोषिक मिळाले आहे. महा व्हिडीओग्राफी स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले. ही स्पर्धा 15 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत पार पडली.

महाराष्ट्र शासन पर्यटन विभागातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत भोते यांनी सहा व्हिडीओ पाठवले होते. विशेष लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत त्यांच्या सहापैकी सहा व्हिडिओंची निवड झाली. प्रत्येक व्हिडिओला दोन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

परगड किल्ला चांदवड, जामगाव वाडा अहमदनगर, मोरगिरी मावळ, घनगड मुळशी, यशवंतगड सिंधुदुर्ग, देवबाग मालवण या व्हिडीओसाठी भोते यांना पारितोषिक मिळाले आहे.

या वर्षीची स्पर्धा वेगवेगळ्या कॅटेगरीत घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील किल्ले, लेण्या, समुद्रकिनारे, वास्तुशिल्प, वाईल्डलाईफ व अद्वितीय गोष्टी अशा स्वरुपाचा समावेश होता. त्यात राम भोते यांच्या चार किल्ले, एक वास्तुशिल्प, एक समुदकिनारा अशा व्हिडिओंची निवड करण्यात आली.

https://www.youtube.com/channel/UCUcWeMIm10b00If-EPOOxsg

राम भोते हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, भौगोलिक सौंदर्याचे दर्शन आपल्या दुर्गवारी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दर्जेदार व माहितीपूर्ण व्हिडिओच्या स्वरूपात करत असतात.

भोते यांनी वर्षभरात सुमारे 60 वेगवेगळे व्हिडीओ बनवून आपल्या दुर्गवारी चॅनेलवरून प्रसारित केले आहेत. यात अनेक गडकिल्ले, लेण्या, सुंदर समुदकिनारे, कोकणातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक परिचित – अपरिचित किल्ले, तीर्थक्षेत्रे, घाट, अप्रतिम निसर्गस्थळे व ऐतिहासिक पावनभूमींचा समावेश आहे.

मावळ भागातील बहुतेक गड, मंदिरे व काही लेण्यांचे सुंदर चित्रीकरण करून त्यांनी लोकांसमोर आणले आहेत. येत्या काही काळात मावळातील बहुतांशी पर्यटन स्थळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात अशा असंख्य महाराष्ट्रातील स्थळांचा मागोवा घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.