Maval News : कुसगावच्या पोलीस पाटील पदी नेमणूक न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगावचे पोलीस पाटील हे पद सुमारे दोन वर्षे झाली तरी शासनाने रिक्त ठेवले आहे. यामुळे शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी कुसगाव ग्रामस्थ आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक 9 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय मैदानात आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन दिले आहे.

शासनाने कुसगावच्या पोलीस पाटील पदावर नियुक्ती न केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शासनाने ग्रामस्थांची घोर फसवणूक केली. मौजे कुसगाव येथे पोलीस पाटील पद रिक्त आहे. हे पद भरावे म्हणून, ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केले. अर्ज, निवेदने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या संदर्भात राज्य शासनाला वारंवार पत्र व्यवहार केला, तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देखील अनेक निवेदने दिली.

मात्र, या गावकऱ्यांच्या प्रश्नावर शासन उदासीन राहिले. त्यामुळे प्रदीप नाईक ग्रामस्थांसोबत 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.