Maval News: आमदार शेळके यांनी वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दिलं ‘मोठ्ठं गिफ्ट’!

तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून देणार वर्षभराचे संपूर्ण वेतन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज (मंगळवार) तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एक मोठे ‘गिफ्ट’ जाहीर केले. आमदार म्हणून त्यांना मिळालेले आजपर्यंतचे म्हणजेच सुमारे एक वर्षाचे संपूर्ण वेतन तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

मावळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शेळके यांचा वर्षभराचा पगार सुमारे 16 लाख 98 हजार रु. इतका आहे. गरीब व होतकरु मुलांना या शैक्षणिक मदतीचा नक्कीच फायदा होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा, असे आवाहन त्यांनी या आधीच केले होते. या आवाहनाला त्यांनी स्वतः कृतीची जोड दिली आहे.

 ‘शिक्षण हे देशाचे भवितव्य घडवणारी अतिशय जमेची बाजू आहे. पण आजही सर्वसामान्य कुटुंबातील गरजू व आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणी उभ्या राहत आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, असे आवाहन मी माझ्या वाढदिवसाच्या आधी केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक ठिकाणी शैक्षणिक मदत केली आहे. पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बळ देण्याचा माझा मानस आहे. त्या अनुषंगाने मी आमदार झाल्यापासूनचे सर्व वेतन स्वेच्छेने शैक्षणिक मदत म्हणून देत आहे, असे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III