Maval News : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी शेतकऱ्यांसह घेतली शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावातील पोल्ट्री फार्म मधील कोंबड्याना बर्ड फ्लू या साथीच्या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने मावळातील पोल्ट्री व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोल्ट्री व्यावसायिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गुरुवारी (दि.28) मुंबई येथे जाऊन भेट घेतली.

बर्ड फ्लू या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मावळातील अनेक ठिकाणी बर्ड फ्लूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असुन या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्या तरी मावळातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 2013 च्या नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढलेल्या उत्पादन खर्च विचारात घेऊन मिळावी तसेच पक्षी नष्ट करण्याऐवजी त्यांची वैदकीय तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन आमदार शेळके यांनी खासदार शरद पवार यांना दिले आहे.

या बैठकीस खासदार शरद पवार यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, मावळचे आमदार सुनील शेळके व मावळ तालुका कुक्कुटपालन शेतकरी संघटनेचे सदस्य व इतर शेतकरी उपस्थित होते.

नुकसान भरपाई देताना वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.