Maval News: कोरोना संकटात कामगार कपात करणाऱ्या उद्योगांवर आमदार शेळके यांची विधानसभेत घणाघाती टीका

विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी शाळांना चाप लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या संकट काळात कामगार कपात करून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लेखापरीक्षण करून त्यांना चाप लावण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. शासनाला आर्थिक चणचण असतानाही मावळ तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळवासीयांच्या वतीने आमदार शेळके यांनी महाविकास आघाडी सरकारचे विशेष आभार मानले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेत शेळके बोलत होते. कोरोनाच्या संकटकाळाचा काही कंपन्या गैरफायदा उठवत असल्याचा आरोप करीत शेळके यांनी मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील संधीसाधू उद्योगांवर घणाघाती टीका केली.

शेळके म्हणाले की, कोरोना महामारी संकटाचा गैरफायदा काही उद्योजक व उद्योग उठवत आहेत. मावळ, खेड, शिरुर या तालुक्यात मोठा औद्योगिक पट्टा आहे. मुळशी, हिंजवडी, माण, बाणेर, हवेली येथे आयटी सेक्टर आहे. या भागात लाखो बांधव काम करीत आहेत. उद्योग उभे राहिले पाहिजेत, तरुणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे. पण गेल्या सहा महिन्यांपासून अनेक उद्योगांनी वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या कायम कामगारांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून थेट कमी करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अशा स्वार्थी पद्धतीने काम करणाऱ्या उद्योगांवर अंकुश आणणे ही सरकारची जबाबदारी आहे.

कोरोनाच्या काळात मंदीचे वातावरण असताना अनेक छोटे-मोठे उद्योग ठप्प झालेले आहेत. कोठेही रोजगार मिळण्याची शक्यता नसताना अशा प्रकारे कंपन्यांनी अचानक कामगारांना कामावरून कमी करणे योग्य नसल्याबाबत कंपन्यांकडे विनंती केली, विचारणा केली, असे सांगून शेळके म्हणाले की, कंपन्या केंद्र शासनाचा जीआर दाखवतात. तीनशे किंवा त्यापेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांना कंपनी किंवा कंपनीतील एखादा विभाग बंद करताना, कामगार कपात करताना परवानगी घेण्याची गरज नाही. तीनशेपेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांनाही नोकरकपतीची प्रक्रिया सोपी झाली आहे.

नोकरकपातीचा उच्चांक गाठलेला असताना ही तरतूद झाल्याने अनेक तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम या कंपन्यांकडून केले जात आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी केला.

कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कंपन्या मंदीत असतील, मागणी नसेल, उत्पादन होत नसेल, निर्यात होत नसेल तर ते आम्हाला मान्य आहे, पण वर्षानुवर्षे कंपनीत काम करणाऱ्या कायम कामगाराला कमी करून पुन्हा काही दिवसांनी त्याच कामगाराला कंत्राटी कामगार म्हणून कमी पगारावर घेणार. 25-30 हजार पगार असलेल्या कामगाराला 12-15 हजार रुपयांवर काम करायला भाग पाडले जात आहे. प्रत्येक कामगाराचे पगारानुसार खर्च ठरलेले असतात, एवढ्याशा पगारात कामगार घराचा हप्ता भरणार, मुलांचे शिक्षण करणार की किराणा मालाचे बिल भागणार, असा सवाल त्यांनी केला. कामगारांना एवढ्या तुटपुंज्या पगारावर कुटुंब चालविणे शक्य नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मावळ तालुक्यात व पुणे जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांबरोबर नोकरीसाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरीत झालेले तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरुणांच्या हाताला काम राहिलेले नाही, त्यामुळे सरकारला योग्य निर्णय घ्यावा लागेल. ठोस भूमिका घ्यावी लागेल. तरुणांचा संयम पाहू नका. मावळ तालुक्यातील मावळ्याच्या नादी लागण्याचे काम कोणी करू नये. तो रस्त्यावर उतरल्यावर काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला.

कामागारांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. विरोधकांनीही केवळ राजकारण करत न बसता तरुणांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘मुजोर’ इंग्रजी शाळांना चाप लावण्याची मागणी
काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. दहा-बारा महिने शाळा बंद असून शंभर टक्के फी मागत आहेत. अनेक उपक्रम चालू नसतानाही त्यांची फी पालकांकडून वसूल करण्यासाठी तगादा लावत आहेत, याकडे आमदार शेळके यांनी शासनाचे लक्ष वेधले. परिस्थिती नसलेल्या पालकांच्या विनंत्यांना जुमानत नाही.फी भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यास बंद करून, शाळेच्या बाहेर ठेवून, नोटीसा पाठवून त्रास देण्याचा उद्योग या शाळा करीत आहेत. अशा सर्व संस्थांचे लेखापरीक्षण करा, या संस्थांना चाप लावला पाहिजे, समज दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी शेळके यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेचे कौतुक
महाविकास आघाडी सरकार गेली 15 महिन्यांपासून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करीत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या महामारीशी संघर्ष करताना पाहात आहोत. या महामारीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सर्व मंत्रीगण, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स, पोलीस, पोलीस पाटील अशी सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे. हा संघर्ष करत असताना मध्यंतरी निसर्ग चक्री वादळ आले. या संकटांशी सामना करीत महाविकास आघाडी सरकार चांगली वाटचाल करीत आहे, त्याबद्दल मी मावळच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो, असे आमदार शेळके म्हणाले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मानले विशेष आभार
राज्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असली, महसुलात 35 टक्के घट असतानाही मावळ तालुक्यातील विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, आरोग्य, ग्रामविकास, एमएसआरडीसी अशा सर्वच विभागांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपसब्ध करून दिला.त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवर्जून आभार मानेन, असे आमदार शेळके म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोणावळा येथे उप जिल्हा रुग्णालय विकसित करण्यासाठी 41 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने आमदार शेळके यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Youtube link:

https://youtu.be/u8umeIm14g4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.