Maval News: आमदार सुनील शेळके रविवारी मांडणार विकासकामांचा लेखाजोखा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा आमदार सुनील शेळके उद्या (रविवारी) पत्रकार परिषदेत मांडणार आहेत.

वडगाव मावळ येथील हॉटेल ओरिटेल येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मावळातील समस्त जनतेला पाहता येणार आहे.

वर्षभरात आपल्या मावळच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काय केले आहे. याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे आमदार शेळके म्हणाले.

मावळ तालुक्याची वाटचाल आश्वासक विकासाच्या मार्गावर सुरु आहे. विकास प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. सर्वेक्षण, प्रस्ताव, तांत्रिक-प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता, निविदा काढल्यानंतर प्रत्यक्ष कामास होणारी सुरुवात यासाठी बराच कालावधी जात असतो.

या अनुषंगाने विविध विभागांमार्फत कोणती कामे पूर्ण झाली, किती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, आगामी काळात नव्याने कोणती कामे सुरु करावयाची आहेत, याची सविस्तर माहिती प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींमार्फत मावळवासीयांपर्यंत पोहचविणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.