Maval news: निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नुकसान भरपाई धनादेशाचे वाटप

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील राजमाची परिसरातील नुकसान झालेल्या नागरिकांना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भरपाई धनादेशचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांना 32 लाखाच्यावर नुकसान भरपाई देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राजमाची परिसरातील नुकसानग्रस्तांना मदत दिली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील उधेवाडी गावात शुक्रवारी (दि.16) झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, राजमाची परिसरातील उदेवाडी गावच्या सरपंच येवले आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, उधेवाडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या राजमाची परिसरातील येणाऱ्या अनेक गावातील घरांचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. त्या नागरिकांना 32 लाखाच्यावर नुकसान भरपाई देण्यात आली. पूर्ण घर पडलेल्या चार नागरिकांना दीड लाख रुपयांप्रमाणे सहा लाख 40 हजार रुपये आर्थिक साह्यय देण्यात आले. घरांची पडझड झालेल्या 61 बाधितांच्या बँक खात्यात 25 लाख 61 हजारांची मदत जमा करण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा रायगड आणि पुणे जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. या भागातील सर्वाधिक नुकसान झाले होते. मावळ लोकसभा मतदारसंघात येणा-या उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, मावळ तालुक्यातील सर्वाधिक नागरिकांचे नुकसान झाले होते.

मावळ तालुक्यासाठी 16 कोटी 28 लाख 97 हजार 900 रुपये नुकसान भरपाईसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी 32 लाख 1 हजार रुपयांच्या धनादेशाचे शुक्रवारी वाटप करण्यात आले. ही मदत राजमाची उधेवाडी परिसरातील नागरिकांना देण्यात आली.

लोणावळा खंडाळापासून 17 किलोमीटर अंतरावर डोंगर, कपारीत राजमाची हा पुरातन किल्ला आहे. आजूबाजूला मोठी झाडी, वनखात्याची जमीन आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या परिसराला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. नागरिकांच्या घरांसह इतर नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. महाविकास आघाडी सरकारने जास्तीत जास्त मदत या भागासाठी दिली आहे. या मदतीसाठी स्थानिक आमदार, खासदारांनी पाठपुरावा केला होता.

महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या फटका बसलेल्याना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राजमाची परिसरातील नुकसानग्रस्तांना मदत दिली आहे, असे बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.