Maval News : संकट काळात खासदार श्रीरंग बारणे शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

नुकसानीची केली पाहणी

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे भात पीक वाया गेले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खालापूर तालुक्यांतील महड, वरद, निंबोडी या गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकाची खासदार बारणे यांनी रविवारी (दि.18) प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. सरकारची मदत मिळवून दिली जाईल. खचून जाऊ नये, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. तहसीलदार ईषद चपलवार, कृषी आधिकारी श्रीमती सुळे, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड, खालापूर शहरप्रमुख पद्माकर पाटील इतर आधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अगोदर निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता कुठे कोरोना महामारीतून बाहेर पडत असल्याचे वाटत असताना पुन्हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे. याबाबत मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.