Maval News : चांदखेड गावात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले; एकतर्फी प्रेमातून केला तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील चांदखेड गावात एका पडक्या घरात तरुणाचा मृतदेह 19 जानेवारी रोजी आढळला. या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना यश आले असून हा खून एका महिलेसह सात जणांनी मिळून एकतर्फी प्रेमाच्या कारणावरून केला असल्याचे उघड झाले आहे.

सचिन नाथा पवार (वय 29, रा. देवाची ऊरुळी, गणेश नगर, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहीणी अमोल ओव्हाळ, संतोष उर्फ अप्पा पोपट पिंजन (वय 36, रा. भांबोली, ता. खेड), कृष्णा भैरव जाधव (वय 36, रा. सांमुर्डी विठ्ठल मंदिराजवळ ता. खेड जि. पुणे), संपत वैजनाथ लांडगे (वय 36, रा. ब-हाडे ता. खेड जि. पुणे. मुळ रा. विठ्ठल वाडी, ता. जि. उस्मानाबाद), विष्णू रघु कोंडे (वय 36, रा. नानोली ता. मावळ जि. पुणे), प्रदीप शांताराम तुळवे (वय 30, रा. करंजविहरे ता. खेड जि. पुणे), नारायण अंबादास आहेर (वय 22, रा. भांबोली राऊत यांचे भाड्याचे खेलीत ता. खेड जि. पुणे. मुळ रा. रेंदाळे ता. येवला जि. नाशिक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदखेड गावात चंदनवाडी येथील अग्रवाल यांच्या मालकीचे बंद पडलेल्या बांधकाम खोलीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट पाच करीत होते. 23 जानेवारी रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एक तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या मिसिंग तरुणाचे वर्णन चांदखेड येथे मृतदेह आढळलेल्या तरुणाशी जुळत होते.

तरुणाची ओळख पटवून पुढील तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सचिन पवार याचे रोहिणी अमोल आव्हाळे या महिलेशी एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे पोलिसांना रोहीणी व तीचे पती अमोल आव्हाळे यांचा संशय आला. त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता रोहिणी हिने तिचे दाजी संतोष पिंजन आणि मानलेला भाऊ कृष्णा जाधव व त्यांचे साथीदार यांच्यासोबत मिळून हा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्हयाची कबुली दिली.

सचिन पवार याला रोहिणी हिने 18 जानेवारी रोजी म्हाळुंगे येथे बोलावून घेतले. त्यानंतर अन्य आरोपींच्या मदतीने सचिन याचे एका कार मधून अपहरण केले. त्याला करंजविहारे गावचे हदीत जंगलाच्या बाजूला नेऊन लाथाबुक्याने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जखमी केले. पुन्हा कार मध्ये बसून सचिन पवार यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गाडीमध्ये मारहाण केली.

काही वेळाने सचिन पवार हा बेशुध्द झाल्याने व त्याची हालचाल बंद झाल्याने त्यास कार मधून संतोष पिंजन, नारायण आहेर व प्रदीप शांताराम तुळवे यांनी चांदखेड खिंडीमध्ये जंगलाच्या बाजूला असलेल्या पडक्या इमारती जवळ नेऊन पुन्हा लोखंडी रॉडने डोक्यावर मारुन रुममध्ये टाकून दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक फौजदार धनराज किरनाळे, पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे, नितीन बहीरट, पोलीस नाईक संदिप ठाकरे, अली शेख, पोलीस शिपाई भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, तांत्रीक शाखेचे पोलीस हवालदार नागेश माळी, शिरगाव पोलीस चौकीच्या महिला पोलीस नाईक अश्विनी कांबळे, विदया ओगले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.