Maval News : अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रास्ता रोको

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितांच्या मालमत्तांवर तसेच अजित पवार यांच्या मालमत्तांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापे मारून तपास केला जात आहे. भाजपकडून ही कारवाई सूडाच्या भावनेतून केली जात असल्याचे म्हणत या कारवाईच्या विरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे शनिवारी (दि. 9) रास्ता रोको करण्यात आला.

दरम्यान द्रुतगती मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी तैनात होता. पोलिसांकडून आंदोलकांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबन भेगडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ राज्यातील जनता रस्त्यावर उतरुन पाठिंबा दर्शवत आहे. आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला आदर्श राजकारणाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा (ईडी)  वापर राजकीय सुडबुद्धीतून करण्याचा नवा अध्याय महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील काही नेते करीत आहेत. पडद्यामागे असणारे सूत्रधार यांनी त्याआधी महाराष्ट्रातील जनतेचे अजित पवार यांच्यावरील प्रेम बघावे. सकाळी सहा वाजल्यापासून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दादा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील जनता तुमच्या अशा षडयंत्राना बळी पडणार नाही. दादांवर सुडबुद्धीतुन केलेल्या या कारवाईचा महाराष्ट्राची जनता निश्चितच विचार करेल.

ज्येष्ठ नेते सुभाष जाधव व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी  शाब्दिक जाहीर निषेध केला.

या आंदोलनाचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी दीपक हुलावळे, सुनील दाभाडे, सुनील नाना भोंगाडे,  कैलास गायकवाड,  पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, सुवर्णा राऊत, वैशाली दाभाडे, काळुराम मालपोटे, तुषार काळोखे, आशिष खांडगे, अतुल राऊत,  आफताब सय्यदसह बहुसंख्येने शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळीच पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, प्रदीप लोंढे, मिलिंद वाघमारे आदींसह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सशस्त्र बंदोबस्त केला.

आंदोलक यांना पोलिसांनी नोटीस दिल्या. शांततेत आंदोलन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.