Maval Crime News : आरोपीचा जामीन करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी 5 लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा विशेष न्यायालयाने बुधवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कामशेत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना शनिवारी (दि.6) दुपारी 3.25 वा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने रोख एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, सुनील भिले, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, रतेश थरकर, किरण चिमटे या पथकाने रविवारी (दि.७) दुपारी २ वा. शिवाजीनगर (पुणे) जिल्हा विशेष न्यायालयात लाच प्रकरणातील आरोपींना हजर केले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी बुधवार (दि.१०) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

पुणे-मुंबई या दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यात पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी आपली वर्णी लावण्यासाठी स्पर्धा करतात. मावळ तालुक्याचे आकर्षण असलेले धनिक पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मर्जी ठेवण्यासाठी त्यांना आदर सन्मान देतात.

पुणे, मुंबई इतर राज्यातील नागरीक छोट्या मोठ्या कामासाठी रक्कमा देत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची हिम्मत वाढत आहे. सर्वसामान्य जनतेची कामे पैसे दिल्या शिवाय होत नाही.

मावळ तालुक्यात महिला न्यायाधीश लाच प्रकरण सुरु असताना, कामशेत पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली. मावळ तालुक्याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार असा सवाल नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.