Maval News : तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचे 15 जानेवारीला मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेल्या निवडणुकांसाठी मावळात उत्साहपूर्ण वातावरण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2020 रोजी होणार असून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती आज (शुक्रवार, दि.11) रोजी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे आदींनी दिली.

मंगळवार (दि. 1) रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मंगळवार (दि. 1) ते सोमवार (दि. 7) हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी होता यात 252 हरकती आल्या होत्या. त्या हरकतींचे निरसन करुन गुरुवार (दि. 10) रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लांबणीवर गेल्याने या 57 ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमण्यात आले. सरपंच, उपसरपंच व सदस्यांना केव्हा निवडणूक होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या मावळ तालुक्यातील इंगळून, कांब्रे नामा, गोवित्री, कुसवली, आंबेगाव, माळवाडी, नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, वेहरगाव, ताजे, मळवली कार्ला, तिकोणा, कोथुर्णे, येलघोल, बऊर, करंजगाव, साई, चिखलसे, टाकवे बुद्रुक, खांड, घोणशेत, आढे, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, दारुंब्रे, कुसगाव बुद्रुक, खडकाळा, येळसे, कशाळ, साते, आपटी, खांडशी, पाटण, वारू, शिवली, मळवंडी ठुले, अजिवली, मोरवे, थुगाव, शिवणे, महागाव, उकसान, डाहुली, शिरदे, कुसगाव खुर्द, नाणे, वडेश्वर, धामणे, आढले खुर्द, उर्से, गहुंजे, सांगवडे, आंबी, कुसगाव पमा, कुरवंडे या 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (दि. 11) रोजी जाहीर करण्यात आला.

मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील तसेच महामार्गालगत असलेल्या अतिमहत्त्वाच्या सोमाटणे, खडकाळा, आंबी, नवलाख उंब्रे, माळवाडी, वेहरगाव, कार्ला, टाकवे बुद्रुक, उर्से, गहुंजे या ग्रामपंचायतीत चुरस सुरु झाली आहे.

पुणे-मुंबई या महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा तसेच नैसर्गिक साधनसामग्री मुबलक असलेल्या मावळ तालुक्याचे आकर्षण राज्यासह देशातील धनिकांना आहे. गावचा सरपंच, उपसरपंच व सदस्यांना महत्त्व असल्याने मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस सुरु झाली असून प्रत्येक इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पा सुरु झाल्या असून निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासाठी चाचपणी करत आहेत.

गावकी, भावकी व नातेवाईक यांच्यातील वाद मिटवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. तर या निवडणुकीसाठी तरुण चेहरे समोर येत आहेत. इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रभाग इच्छुक उमेदवार कमी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कसरत करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार वाढदिवस व कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करत आहेत. तर सोशल मीडियावर प्रसिद्धीचे फ्लेक्स पाठवले जात आहेत.

मंगळवार (दि. 15) रोजी तहसीलदार मधुसूदन बर्गे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नोटीस जाहीर करणार आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी बुधवार (दि. 23) ते बुधवार (दि. 30) पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असून सार्वजनिक सुट्टी (दि. 25, 26 व 27 डिसेंबर) असा असणार आहे.

नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा कालावधी गुरुवार (दि. 31) सकाळी 11 ते छाननी संपेपर्यंत असा असेल.

नामनिर्देशनातून माघार घेण्याचा कालावधी सोमवार (दि. 4 जाने.) दुपारी 3 वाजेपर्यंत असून त्याच दिवसी दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

शुक्रवार (दि. 15 जाने.) सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल.

सोमवार (दि. 18 जाने.) रोजी मतमोजणी होऊन गुरुवारी (दि. 21 जाने.) रोजी ग्रामपंचायत निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.