Maval News : डोंगरकुशीतले कोविडग्रस्त ‘कळकराई’ प्रकाशले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम व सह्याद्री डोंगरांनी वेढलेल्या व सध्या कोविडग्रस्त असलेले कळकराई गाव सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीतील तुटलेल्या वीजतारांची दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी (दि. 8) सायंकाळी पुन्हा प्रकाशले. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे खडतर काम पूर्ण केले आहे.

आंदर मावळातील अतिदुर्गम व 55 वीजग्राहकांचे कळकराई गाव मावळ, खेड व कर्जत तालुक्यांच्या सिमेवर आहे. या गावात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने अर्धे ग्रामस्थ गावाबाहेर तर अर्धे ग्रामस्थ घरातच आहेत. मुख्य ग्रामपंचायत असलेल्या सावळा गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत डोंगरपायथ्याच्या या गावात पायवाटेने जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही. महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे सावळा येथे रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे कळकराईला वीजपुरवठा केला जातो. यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगरपायथ्याशी चार वीजखांबाचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असून त्यावरील सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीमधून वीजतारा टाकण्यात आल्या आहेत.

गेल्या सात दिवसांपूर्वी आंदर मावळात अवकाळी वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यामध्ये दरीत असलेल्या सुमारे 800 मीटर लांबीच्या तीनही वीजतारा तुटल्या आणि कळकराई गावामधील वीजपुरवठा खंडित झाला होता. अतिशय खोल व कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्तीचे काम अतिशय जिकरीचे व आव्हानात्मक होते. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वीजपुरवठा ताबडतोब सुरु करणेही आवश्यक होते. तथापि वादळी पावसामुळे निसरड्या डोंगरदरीमध्ये काम त्वरीत सुरु करणे शक्य झाले नाही.

राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गरूड, मावळचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव यांनी कळकराई गावाला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. त्यानंतर शाखा अभियंता श्याम दिवटे तसेच 30 जनमित्र व कंत्राटदारांचे कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दि. 7 मे रोजी दुरुस्ती कामाला सुरवात केली व दुसऱ्या दिवशी वीजतारांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करीत सायंकाळी कळकराई गावाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.