Maval News : कोरोना रुग्णांचा ताणतणाव कमी करणारे प्रा. महादेव वाघमारे यांचा तहसीलदारांकडून विशेष सत्कार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 4 कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन कोरोना रुग्णांच्या मनावरील ताणतणाव कमी करणारे प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सोमवारी (दि.2) त्यांच्या कार्यालयात विशेष सत्कार करुन प्रशस्तीपत्र दिले.

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पाश्चात तंत्रज्ञान संस्था कोविड केअर सेंटर, टाकवे खुर्द येथील समुद्रा कोविड केअर सेंटर, इंदोरी येथील तोलानी कोविड केअर सेंटर व लोणावळा कोविड केअर सेंटरमध्ये दर दहा दिवसाला सातत्याने कोरोना रुग्णांच्या मनावर कोरोना आजाराचा ताण असताना, त्यांना खास मकरंद अनासपुरे शैलीत विविध विनोद, मराठी चित्रपटातील प्रसंग तसेच मानसशास्त्रीय उदाहरणे देऊन रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम करत आहेत.

मावळ तालुक्यात ज्यावेळेस कोरोना रुग्णाच्या संपर्कात कोणी जात नव्हते तेव्हापासून हा हास्य कलाकार सातत्याने कोरोनाच्या रुग्णांना धीर देण्याचे काम करत असल्याने मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी प्रा. महादेव वाघमारे यांच्या कार्याची दखल घेऊन खरा कोरोना योद्धा म्हणून विशेष सत्कार करुन प्रशस्तीपत्र दिले.

याप्रसंगी प्रा. महादेव वाघमारे म्हणाले मानवाच्या शरीराला आजार नसतो तो मनात आजार निर्माण होतो. आजारात केवळ आधाराची गरज असते. त्याच्या मनावर आलेला ताण हा हास्य विनोदातूनच कमी होतो.

तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी हास्य टॉनिक अत्यावश्यक आहे. कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याची प्रेरणा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून मिळाली असून आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये हास्य विनोदाचा कार्यक्रम सादर करताना आणखी आत्मविश्वास मिळाला. मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी माझा सत्कार करुन मला आणखी काम करण्याची ऊर्जा दिली.

याप्रसंगी निवासी नायब तहसिलदार रावसाहेब चाटे, नायब तहसिलदार प्रसन्न केदारी, नायब तहसिलदार संतोष सोनवणे, मंडल अधिकारी बजरंग मेकाले, संदीप माळोदे, उत्तम लोंढे व कर्मचारी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.