Maval News : पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यांसाठी बैठक कक्ष उपलब्ध करून द्या

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे निवेदन

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना बैठक कक्ष उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली. याबाबत सोमवारी (दि.27) निवेदन देखील देण्यात आले आहे. पंचायत समितीमध्ये अधिकारी त्यांच्या कार्यालयात असतात तर जनतेचे प्रतिनिधी रस्त्यावर ताठकळत उभे असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींसाठी बैठक कक्ष असायला हवा, अशी मागणी पुढे आली आहे.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे पदाधिकारी भिकाजी भागवत, समीर कदम, गोपाळ पवळे, दिगंबर आगीवले, शरद जाधव, मनोज येवले, सोपान सावंत, योगेश राक्षे, दिनेश चव्हाण, मोहन घोलप, बळीराम भोईरकर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती असुन त्यांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत हद्दीतील दैनंदिन विविध विकासकामासंदर्भात मावळ पंचायत समितीच्या कार्यालयात येतात. त्यांना बैठक कक्ष नाही. काही वेळा त्या संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना इतरत्र कुठेही थांबावे लागते किंवा उभे राहावे लागते. या लोकप्रतिनिधीची गैरसोय होत आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मावळ तालुकाध्यक्ष सुनील नाना भोंगाडे म्हणाले जनतेची व गावची विकासकामे करण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्य मावळ पंचायत समितीत येतात. अधिकारी त्यांच्या कार्यालयात असतात. तर गावचे कारभारी रस्त्यावर उभे असतात. पण या लोकप्रतिनिधीला बैठक व्यवस्था नाही याची खंत वाटते.

मावळचे आमदार सुनील शेळके वारंवार सरपंच, उपसरपंच व सदस्यांना जनतेची व गावची कामे करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सांगतात. आमदार सुनील शेळके यांनी मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना याबाबत पत्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.