एमपीसी न्यूज – शुक्रवार (दि 18) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या वतीने, केंद्र सरकारने  कांदा  निर्यातीवर जी बंदी घातली आहे.त्याच्या  निषेधार्थ वडगाव तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन  देण्यात आले.

कांदा निर्यातबंदी निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने सध्या मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली असून कांद्याला चांगला भाव सुद्धा मिळायला लागला होता, तर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी घातली. ही निर्यातबंदी बिहारमधील निवडणूका डोळयासमोर ठेवून केलेली आहे. हे सरकार शेतक-यांचे सरकार नाही  असे निवेदनात म्हटले आहे.

या एका चुकीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारने देशोधडीला लावला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तर शेती पिकेल असे ही स्पष्ट करून सरकारने शेतक-यांच्या हितासाठी निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.

या वेळी मावळ तालुका ग्रामीणचे अध्यक्ष सुभाष जाधव, तालुका महिला अध्यक्षा  सुवर्णा राऊत, खादी ग्रामोद्योग संघाचे  अध्यक्ष अंकुश आंबेकर, वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, तळेगावच्या उपनगराध्यक्षा  वैशाली दाभाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस व माजी उपसरपंच विशाल वहिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच तुकाराम ढोरे, मावळ तालुका महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस उमा शेळके, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता काळोखे, वडगाव शहर अध्यक्षा ज्योती जाधव, तळेगाव  शहर युवती अध्यक्षा निशा पवार, सरचिटणीस तळेगाव शहर रेखा दरेकर, प्रभारी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल मंगेश खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.