Maval News: कोरोना निर्मूलनासाठी कामशेतमध्ये शनिवारपासून सहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

एमपीसी न्यूज  – कामशेत शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची साखळी रोखण्यासाठी सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. शहरातील नागरिक व व्यापारी यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. 

यानुसार 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान  शहरातील सर्व व्यावहार बंद राहणार आहेत. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. शहरात 150 जणांना कोरानाची लागण झाली असून 09 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू हाच योग्य पर्याय पुढे आला आहे. त्या अनुषंगाने जनता कर्फ्यू दरम्यान शहरात केवळ दवाखाने व मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत, तर दूध व कृषी सबंधित  दुकाने सकाळी 9 ते दुपारी 12 दरम्यान सुरू राहणार आहेत.

बंद दरम्यान सर्वांनी नियमांचे पालन करून घरातच थांबायचे आहे. यासाठी विभागवार समिती तयार करण्यात येणार आहे.  नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहरातील व्यापारी बांधवांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे तसेच दुकानात सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे.

कोरोना रुग्ण सापडले आहेत तो भाग सॅनिटायज करून घेणे, रुग्णाच्या घरातील व संपर्कातील सदस्यांचे विलगीकरण करणे ही कामे प्रशासनाने तातडीने करून घ्यावीत, सर्व हेवेदावे बाजूला ठेवून प्रत्येकाने कोरोना रोखण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे निर्णय नागरिक व व्यापारी यांच्या बैठकीत घेण्यात आले.

शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी शहरातील सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.  शहरातील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.