Maval News : इंदोरी येथील शिवप्रसाद हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; सव्वा लाखाची दारू जप्त

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी येथे चाकण-तळेगाव रस्त्यावर असलेल्या शिवप्रसाद ढाबा अँड गार्डन रेस्टोरंटवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. त्यात पोलिसांनी एक लाख 21 हजारांची दारू आणि पाच हजार रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.

हॉटेल चालक मालक अक्षय नारायण पवार (वय 26, रा. पानसरे वस्ती, इंदोरी) याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रस्त्यावर इंदोरी येथे शिवप्रसाद ढाबा अँड गार्डन रेस्टोरंटमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू आणि बिअरची विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हॉटेलवर छापा मारला.

या कारवाईमध्ये एक लाख 21 हजार 858 रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि बिअर तसेच पाच हजार 50 रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 26 हजार 908 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, भगवंता मुठे, अमोल शिंदे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.