Maval News: आमदार शेळके यांच्या प्रयत्नांतून तालुक्यासाठी अत्याधुनिक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना

एमपीसी न्यूज – शेतकरी हा आपल्या पशुधनावर पोटच्या मुलांसारखे प्रेम करीत असतो. या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून मावळ तालुक्यासाठी औषधे व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज फिरता पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध झाला आहे. या फिरत्या दवाखान्यामुळे मावळ तालुक्यात कोणत्याही जनावराचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागा अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सुरू करण्यात आली आहे. आमदार शेळके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या योजनेच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी अत्याधुनिक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध झाला आहे. त्याच्या लोकार्पण समारंभात आमदार शेळके बोलत होते. त्यावेळी युवा नेते धनंजय काळोखे, अनिल मालपोटे, गणेश थिटे, कल्पेश मराठे, सचिन वामन व इतर मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यात पशुधनाच्या तुलनेत कमी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुधनास औषधोपचार, लसीकरण, शस्‍त्रक्रिया इत्यादी पशुसंवर्धन विभागामार्फत आरोग्य सेवा नियमितपणे पुरविल्या जातात. परंतु पशुधन आजारी पडल्यास पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते. यासाठी पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते. बहुतांश शेतकऱ्यांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकदा पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधनाचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

पशुवैद्यकीय सेवा पशुपालक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकांसाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहन उपलब्ध झाले आहे. मध्यवर्ती कॉल सेंटर द्वारे फिरते पशुचिकित्सा वाहन सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समन्वय ठेवून कमीत कमी वेळात पशुपालक शेतकऱ्यांना योग्य व आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.