Maval News: बाळा भेगडे यांनी दिलेली आकडेवारी ‘संशयकल्लोळ’ वाढविणारी, आमदार शेळके यांचा पलटवार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी 1642 कोटी 92 लाख रुपयांचा निधी आणल्याचा दावा माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केला असला तरी त्यांनी सादर केलेली आकडेवारी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झालेली आकडेवारी यात तफावत असल्याने तालुक्यातील जनतेच्या मनात ‘संशयकल्लोळ’ निर्माण झाला आहे. त्यामुळे भेगडे यांनी गावनिहाय व विकास कामनिहाय तपशीलवार माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आज भेगडे यांना देण्यात आले.

तालुक्यात 1400 कोटींचा विकासनिधी आणल्याचा दावा करणाऱ्या भाजपने त्याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिले होते.

त्यावर पत्रकार परिषद घेऊन भेगडे यांनी 1400 नव्हे 1642 कोटी 92 लाखांचा निधी आणला असला तरी कामे प्रलंबित असल्याचा आरोप करून आकडेवारीबाबत आमदार शेळके यांना लेखी पत्र पाठविले होते. त्या पत्रातील आकडेवारीविषयी शंका उपस्थित करीत मंजूर निधीचा तपशील देण्याची मागणी करणारे पत्र आमदार शेळके यांनी भेगडे यांना पाठविले आहे.

हे पत्र देण्यासाठी आमदार शेळके गेले आठ दिवस प्रयत्न करीत होते, मात्र विविध कारणांनी ते पत्र स्वीकारण्याचे टाळले जात होते. अखेर आठवडाभराने आमदार शेळके यांचे पत्र भेगडे यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात आले.

सन 2014 ते 2019 या कार्यकाळातील आपण प्रसिद्ध केलेल्या 1642 कोटी 92 लक्ष रुपयांच्या विकासनिधीची विस्तृत माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

आपल्या कार्यकाळातील मंजूर व उपलब्ध केलेल्या विकासकामांच्या शीर्षकांसह निधीची आकडेवारी लेखी स्वरुपात दिली. ही माहिती यापूर्वीच आपण निवडणुकीच्या काळात जाहीर केल्याने सर्वश्रुत आहे. विद्यमान आमदार या नात्याने मी या विकासकामांची माहिती संबंधित शासकीय विभागाकडून गेल्या सहा महिन्यांपासून प्राप्त करीत आहे.

परंतु, मला प्राप्त झालेली आकडेवारी व आपण प्रसिद्ध केलेल्या निधीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे, असा आक्षेप आमदार शेळके यांनी घेतला आहे.

यापूर्वी 1400 कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले असताना आता 1642 कोटी 92 लक्ष रुपयांची आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यातच शासकीय अधिकारी व आपल्या आकडेवातीतील तफावतीमुळे तालुक्यातील जनतेमध्ये साशंकता निर्माण झालेली आहे, असे शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

आपण प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक शीर्षकांतर्गत गावनिहाय व कामनिहाय माहिती उपलबद्ध व्हावी, जेणेकरून मला तालुक्‍याच्या विकासाचा अभ्यास करणे सोयीस्कर होईल. तसेच आपण सांगितल्याप्रमाणे 100 कोटी रुपयांची विकासकामे रखडलेली आहेत.

त्या कामांची देखील शीर्षकासह गावनिहाय व कामनिहाय विस्तृत माहिती उपलब्ध व्हावी, अशी विनंती आमदार शेळके यांनी भेगडे यांना केली आहे.

तळेगाव – चाकण हा राष्ट्रीय मार्ग मंजूर असल्याचे प्रशासकीय मान्यता असलेले पत्र उपलब्ध व्हावे. त्यानुसार या कामांचा मी पाठपुरावा करून मावळच्या विकासात भर घालीन, अशी ग्वाही देखील आमदार शेळके यांनी पत्रात दिली आहे.

सदरहू विस्तृत माहिती मला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आपले मोलाचे अनुभव आम्हाला ज्ञात असून ज्या ठिकाणी मला अडचण येईल, त्यावेळी आपले मार्गदर्शन घ्यायला आवडेल, असेही आमदार शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.