Maval News : कोरोना काळात मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना 12वी पर्यंतचे शिक्षण मोफत देणार : आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर परिवार आहे. दीड वर्षात पक्षाने दोन उपजिल्हा रुग्णालय, 13 पूल, ग्रामीण व जिल्हा मार्ग रस्ते, प्रशाकीय इमारतीसाठी 22 कोटीचा निधी, तसेच 5 रुग्णवाहिका उपलब्ध केल्या. पक्षानी माझ्यावर जबाबदारी दिली, त्यानुसार कार्यकर्ते व जनतेला न्याय देणे हीच माझी जबाबदारी. ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू कोरोनाच्या काळात झाला त्या विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत मोफत शिक्षण राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे व विकास कामे घराघरात पोहचवण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या मंडपात गुरुवारी (दि.10) सकाळी 11 वा. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आशा सेविका व पत्रकारांचा आमदार शेळके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देवून सत्कार करण्यात आला. या वेळी  माळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील   भोंगाडे यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुक्याच्या जनतेला मोफत औषधोपचार उपलब्ध करुन देण्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यात आली. या  रुग्णवाहिकेचे या वेळी लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, दिपक हुलावळे, अंकुश आंबेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, युवक तालुकाध्यक्ष सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, सुनिल नाना भोंगाडे, ज्येष्ठ नेते नारायण ठाकर, आशिष खांडगे, अॅड रुपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, अतुल राऊत, आफताब सय्यद, भाऊ ढोरेसह बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले,  माजींची खुर्ची मावळच्या जनतेने दीड वर्षापूर्वी काढून घेतली. माजी मंत्र्यांनी काढून घेतलेल्या खुर्चीवर बसू नये. काम करण्याची संधी दिली तोपर्यंतच खुर्चीवर  बसायचे. आपण माजी झालात याचे भान ठेवा. आरोपात सत्यता पाहिजे. कोणीही सांगावे बदल्या व ठेकेदारांकडून आम्ही पैसे घेतल्याचे ? असा सवाल करीत  सुनिल शेळकेचा सात बारा  काढायचे काम सुरु असल्याचा हल्लाबोल आमदार शेळके यांनी केला.

आमच्यावर आरोप केले तरी सहन करू, पण भ्रष्टाचाराचा आरोप सहन करणार नाही. स्वाभिमानाने काम करणारे आम्ही आहोत, असे ही शेळके यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे म्हणाले,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यांचे बगलबच्चे तसेच मावळातील भाजप नेते  सक्षम नेतृत्वावर टीका करत आहे. जिंकलेल्या व्यक्तीला काम करू देण्याची परंपरा आहे. सत्ता गेली तरी माजी राज्यमंत्र्याला खरे वाटत नाही. त्यांच्या डोक्यात हवा आहे म्हणून ते आजही काम करणाऱ्यांवर टीका करतात.

आगामी निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याची सर्वानुमते हात उंचावून ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी  मान्यता घेतली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले. आभार युवक तालुकाध्यक्ष सुनिल दाभाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.