Maval News: तळेगाव ग्रामीण रूग्णालयात 1000 पेक्षा अधिक कोविड रूग्णांवर यशस्वी उपचार

एमपीसी न्यूज – तळेगाव​ दाभाडे ​येथील “मायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालयात 1000 पेक्षा अधिक कोविड रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.” अशी माहिती मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी दिली. 

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय हे मावळ तालुक्यातील एकमेव डेडिकेटेड कोविड रूग्णालय (डीसीएच) आहे. या रूग्णालयात मध्यम ते अति तीव्र स्वरूपाच्या कोविड रूग्णांवर उपचार करण्याची सोय आहे. कोविड रूग्णांसाठी एकूण 356 सुसज्ज खाटा आहेत. त्यापैकी 148 ऑक्सिजन खाटा व 16 व्हेन्टिलेटरसह 20 खाटांचा अतिदक्षता विभाग, कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स, कोविड रूग्णांसाठी प्रसूतीची सोय इत्यादी व्यवस्था उपलब्ध आहे.

रूग्णालयामध्ये अद्ययावत अशी लिक्विड ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आली आहे. जेणे करून रूग्णांना अविरत ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध झाला आहे. तज्ञ डॉक्टरांतर्फे कोविडसाठी उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटरची माहिती नातेवाईकांना पुरवली जाते.

नॉन कोविड रूग्णांसाठीही संपूर्ण वैद्यकीय सेवा पूर्ण क्षमतेने चालू आहे. पात्र लाभार्थी रूग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व इतर रूग्णांसाठी अत्यंत माफक दरात रात्रंदिवस तज्ञ डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उत्तम सेवा देत आहेत. गेली 25 वर्षे डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय अविरत सेवेसाठी सदैव तत्त्पर आहे.

भविष्यात कोविड रूग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच कोविड संसर्ग साथीच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात गरज पडल्यास अधिक खाटा उपलब्ध करण्याची तयारी असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.

कोविड आजारपणातून बरे झालेल्या रूग्णांकरीता विशेष कोविडपश्‍चात बाह्यरूग्ण विभाग(कोविड-फॉलोअप ओपीडी) लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालयातील सर्व कर्मचारी, नर्सेस व डॉक्टर करीत असलेल्या परिश्रमांसाठी व्यवस्थापनाच्या वतीने वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. विरेंद्र घैसास आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.