Maval News: सुशांत सिंह मृत्यू प्रकरण… ड्रग्ज कनेक्शन आणि मावळातील हँगआऊट व्हिला!

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मावळातील पवना धरण परिसरातील ‘हँगआऊट व्हिला’ हे फार्महाऊस चर्चेत आले. सुशांत सिंह  व त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी काही वेळा या फार्महाऊसवर येऊन सुट्टीचा आनंद घेतला होता. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शनचा विषय समोर आला आणि त्याबाबत चौकशी करणारे अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीची टीम थेट मावळात दाखल झाली आणि ‘हँगआऊट व्हिला’ पुन्हा एकदा चर्चेत आला.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यामुळे त्यात एनसीबीची एंट्री झाली. एनसीबीने तपासाची सूत्रे हाती घेत अटकसत्र सुरू केले. त्यात चौकशीअंती रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली. याच चौकशीत सुशांत आणि रिया सुट्टीसाठी येत असलेल्या हँगआऊट व्हिलाची माहिती एनसीबीच्या हाती लागली.

या फार्महाऊसवर ड्रग्ज कनेक्शन सिद्ध करणारे काही पुरावे मिळतात का, याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी दुपारी एनसीबीची टीम ‘हँगआऊट व्हिला’ या फार्महाऊसवर दाखल झाली. मुख्य बंगल्यासह संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांची तपासणी मोहीम सुरू होती.

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन धडकले, मात्र त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी काहीही बोलण्याचे टाळले. त्यामुळे ‘हँगआऊट व्हिला’मध्ये एनसीबीच्या हाती काय लागले, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील निसर्गसौंदर्य कोणालाही भुरळ घालणारे आहे. त्यामुळे अनेक उद्योगपती, बडे व्यापारी, कलाकार, सेलिब्रिटी आदींनी या परिसरात जागा घेऊन बंगले बांधले आहेत. धकाधकीच्या जीवनातून दोन-चार दिवस नीवांत आराम करण्यासाठी ही मंडळी या फार्महाऊसवर येऊन राहतात. या फार्महाऊसेसमध्ये होणाऱ्या पार्ट्या, चालणारा धिंगाणा हा कित्येकदा परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठी त्रासदायकही ठरतो.

अभिनेता सुशांतसिंह याने ‘हँगआऊट व्हिला’ हे फार्महाऊस काही वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते, अशी माहिती मिळत आहे. तो त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सुट्टी एन्जॉय करायला या ठिकाणी अनेकवेळा मिळण्यासाठी या ठिकाणी येत होता.  या फार्महाऊसवर काही पार्ट्या झाल्याचीही चर्चा आहे.  रिया व सुशांतसिंह हे देखील काहीवेळी विश्रांतीसाठी येथे आल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे हँगआऊट येथे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळतात का, याची शहानिशा एनसीबी पथकाने केली. त्यातून काय निष्पन्न झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.