Maval Corona news: गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर उपाययोजना करा – श्रीरंग बारणे

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलपेक्षा घरी उपचार घेणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे. ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मावळ तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार बारणे यांनी मंगळवारी (दि.20) वडगांव पंचायत समिती कार्यालयात बैठक घेतली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

प्रांतअधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा परिषद सदस्या शैलजा खंडागळे, पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोयारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, उत्तम शिंदे, शांताराम कदम, लोणावळा, वडगाव, तळेगांव दाभाडे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस खात्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी

खासदार बारणे म्हणाले, पुणे जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मावळ तालुक्यात देखील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तालुक्यात आजरोजी सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 552 झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग, प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येतो. गर्दी टाळावी. गर्दी करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्याबाबत उपाययोजना कराव्यात.

हॉस्पिटलपेक्षा घरी असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे. ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर उपाययोजना कराव्यात. हॉटस्पॉट असलेल्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

तळेगांवदाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत सर्वाधिक 326 सक्रिय रूग्ण आहेत. लोणावळ्यात 274 रूग्ण आहेत. शहरी भागात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आहे. तिथे तत्काळ उपाययोजना कराव्यात. कोरोनाचा प्रसार होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. बेडची कमतरता, रेमिडिसेवीर इंजेक्शनची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्रांच्या समस्याही जाणून घेतल्या.

रुग्णवाढ होणार नाही. प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवर सर्वांना एकत्र घेऊन पुढील उपाययोजना केल्या जातील. सूचनांची दखल घेऊन, विभागाशी चर्चा करून पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही प्रांतअधिकारी, तहसीलदार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.