Maval News : स्वातंत्र्योत्तर काळापासून देशाच्या प्रगतीसाठी टाटा समूहाचा हातभार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्योत्तर काळापासून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणारा पहिला उद्योग समूह हा टाटा समूह असून कोरोना महामारीच्या संकटात सर्वात जास्त मदत करणारा आहे, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

मावळमध्ये आदिवासी व कातकरी समाजाला टाटा पॉवर कंपनीच्या वतीने एक हजार रेशन किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बारणे बोलत होते.

यावेळी मावळ पंचायत समितीच्या सभापती निकीता घोटकुले, तहसिलदार मधुसूदन बर्गे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माजी सभापती गुलाब म्हाळसकर,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, जिल्हा परिषद सदस्या अलका धनिवले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, भारत ठाकूर, संतोष कुंभार, मदन शेडगे, टाटा धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी, शिर्षकामे प्रमुख मनोहर म्हात्रे आणि सीएसआर मॅनेजर अतुल करवटकर आदी उपस्थित होते.

यावेळी टाटा जलविद्युतचे प्रमुख प्रभाकर काळे यांनी यावेळी सांगितले की “कोरोना काळात जेथे शहरी भागातील गरजू लोकांचे दोन वेळच्या अन्नासाठी हाल होतात, तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील वंचित कातकरी बांधवांचे काय हाल होत असतील? याचा विचार करून आज आम्ही टाटा पाॅवर कंपनी जलविद्युत विभागातर्फे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मावळ भागामध्ये खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे व आमदार सुनील शेळके यांच्या शुभहस्ते रेशन कीट आणि पीपीई कीट चे वाटप करत आहोत”

तसेच टाटा पाॅवर कंपनीच्या भिवपूरी व खोपोली जलविद्युत केंद्रांचे प्रमुख फुलेंद्र धुरंदर यांनी सांगितले की, “ 100 वर्षाहून अधिक काळ, टाटा उद्योग समूहाचे नेतृत्व, संस्थापक जमशेटजी टाटा यांच्या दूरदृष्टिशी इमान राखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींनी केले. एक दूरदृष्टी, जिच्यामुळे उद्योगाच्या वाढीच्या बरोबरीने समाजाचे जास्त भले साधण्यात आले. एक दूरदृष्टी, जिच्यामुळे सामाजिक कार्यातील योगदानात अग्रेसर राहून, जबाबदार व्यवसाय करण्याची असलेली पद्धतच बदलली अशा वातावरणात टाटा आणि महामारीच्या काळात एक सामाजिक जाणीव या भावनेने आज एक छोटीसी मदत याद्वारे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.