Maval News: स्पर्श हॉस्पिटल व बढे हॉस्पिटलवर कारवाई करण्याची तहसीलदारांची शिफारस

अरुण माने, दिलीप डोळस, जमीर नालबंद यांचे पाठपुराव्यास यश"

एमपीसी न्यूज – मावळातील सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटल व बढे अ‍ॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी रूग्णालय येथे चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या बिलआकारणी तसेच रुग्ण व त्यांच्या चुकीच्या वागणुकीचा ठपका ठेवत, साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार दोन्ही हॉस्पिटलवर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदार मधुसूदन बर्गे मावळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

स्पर्श हॉस्पिटलमध्ये चुकीच्या बिल आकारणी व सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांशी चुकीची वागणुकी बाबत संबंधित प्रकरणात सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे बाबत दि 17 जुलै 2020 रोजी निवेदन देण्यात आले  होते. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ जाधव यांचे नेतृत्वाखाली चौकशी पथक नेमून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दि 22 जुलै 2020 रोजी सदर चौकशी समितीने तहसीलदारांना अहवाल सादर केला.

स्पर्श रुग्णालय सोमाटणे फाटा येथे आवश्यकता नसताना तपासण्या करणे, पीपीई किटचे बिल अवाजवी आकारणे, रूग्णांना अनावश्यक औषधे देणे, शिल्लक औषधे परत घेण्यास नकार देणे अशा प्रकारची अनियमितता चौकशी पथकाला आढळून आली आहे, असे तहसीलदारांनी पत्रात म्हटले आहे.

कोविड 19 कक्ष बढे अ‍ॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी रूग्णालय येथेही आवश्यक नसलेल्या तपासण्या करणे, पीपीई किटचे बिल अवाजवी आकारणे, रूग्णाला अनावश्यक औषधे देणे आदी गोष्टी नेमलेल्या चौकशी पथकास आढळून आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही रूग्णालयांवर केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार मावळ यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

सोमाटणे फाटा येथील स्पर्श रूग्णालय येथे रूग्णांच्या बाबतीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत नगरसेवक अरूण माने, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, जमीर नालबंद यांनी तक्रार केली होती.

 सदर दोन्ही हॉस्पिटल रुग्णांची अनावश्यक तपासणी व औषधांच्या नावाखाली मोठया प्रमाणात पैशाची लूट करत आहेत असा ठपका ठेवत गरजू व गरीब नागरिकांवर अन्याय होऊ नये व शासनाने निश्चित केलेले दर आकारावेत तसेच खाजगी हॉस्पिटलकडून नागरिकांची लूट होऊ नये यासाठी अशा हॉस्पिटलच्या विरोधात कठोर कारवाईसाठी माने, डोळस व नालबंद हे पाठपुरावा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.