Maval News : कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी राज्यशासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सर्वपक्षीय समिती नेमावी – गणेश भेगडे 

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी राज्यशासनाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सर्वपक्षीय समिती नेमावी अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे पाठविण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ई-मेल व ट्विटरद्वारे पाठविण्यात आले आहे.

भेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपल्या राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता तर या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील बहुतांश घरात या रोगाची लागण झाली आहे. अनेक घरातील 2-2, 3-3 कर्ते लोक मृत्यू पावले आहेत. कुटूंबाच्या कुटुंबे मृत्यूशी संघर्ष करताना दिसत आहेत. परिस्थिती अत्यंत हालाखीची व भयाण आहे. रोजगार बंद झाल्याने उपासमारी देखील जाणवू लागली आहे. हॉस्पिटलची बिले भरण्यासाठी नागरीकांकडे पैसे नाहीत. त्यातच हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, रेमडेसिवर इंजेक्शन, टोसिलीझुमब इंजेक्शन यांची खूपच कमतरता जाणवत आहे.

काळाबाजारालाही ऊत आला असून सर्वसामान्यांचे तर कंबरडेच मोडले आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहेत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही भयाण असेल तर अशी तिसरी लाट निर्माण झाली तर जनतेचे काय हाल होतील. याची कल्पना न केलेलीच बरी अशी खंतही भेगडे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

अशा संकटाच्या परिस्थितीत राज्यात राजकारणाला ऊत आलेला आहे. प्रत्येक जण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताना दिसतो आहे. कधी केंद्र सरकार तर कधी राज्य सरकार असा सोयीस्कर निशाणा नेते लावताना दिसत आहे. जबाबदारी कोणाची आहे किंवा होती ते नंतर जनता ठरवेल. आपण मात्र या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र येवून या रोगाचा मुकाबला करण्याची गरज आहे. राज्य संकटात असताना ‘वयं पंचाधिकम् शतम्’ या उक्तीप्रमाणे या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येवून लढले पाहिजे, असेही स्पष्ट मत निवेदनात व्यक्त केले आहे.

कोरोना बाधीत रुग्णांना बरे करण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी एकत्र येवून उपाययोजना करायला हव्यात. सर्व राजकारण बाजूला ठेवून या महामारी विरोधात लढण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात यावी. या समितीच्या अध्यक्षपदी अभ्यासू व व्यवस्थापनातील जाणकार म्हणून माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात येवून सर्व पक्षांच्या अभ्यासू व वेळ देणाऱ्या नेत्यांना या समितीत घेण्यात यावे. सात ते नऊ सदस्यांची समिती करण्यात येवून कोरोना महामारीचे संकट निवारण करण्यासाठी जे लागतील ते सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात यावेत. तरच या महामारीच्या संकटात राजकारण होणार नाही व आरोप प्रत्यारोपही होणार नाही. केंद्राकडूनही हवी ती मदत मिळवता येईल.अशा प्रकारचा निर्णय आपण घेवून महाराष्ट्राच्या जनतेला या कोरोना महामारीच्या खाईतून बाहेर काढावे अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

आपण हे पत्र लिहणारा भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून न पाहता राज्यातील एक सर्वसामान्य नागरीक म्हणून पाहावे, अशी विनंती देखील भेगडे यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.